निवडणूकांच्या आधीच आम्ही युती जाहीर करत आहोत : प्रकाश आंबेडकर

सोमवार, 13 डिसेंबर 2021 (14:56 IST)
मुंबई महापालिका निवडणूकांसाठी तिसरी आघाडी म्हणून उतरण्याचा आमचा मानस आहे. मुंबई महापालिकेच्या निवडणूकांबाबतची चर्चा सध्या अनेक सामाजिक संघटनांसोबत होते आहे. राजकीय पक्षांची एक युती म्हणून वंचित बहुजन आघाडी, इंडियन युनियन मुस्लिम लिग, राष्ट्रीय जनता दल यांच्याशी बैठका होऊन युती करायचा निर्णय झाला आहे. आगामी महापालिका निवडणूकांच्या आधीच आम्ही ही युती जाहीर करत असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले. 
 
युतीमार्फत जानेवारी महिन्यात जागांची घोषणा केली जाणार आहे. तसेच प्रचाराचा भाग म्हणून आम्ही प्रचाराला सुरूवात करत आहोत, असेही ते म्हणाले. आज सर्वोच्च न्यायालयात ओबीसी आरक्षणाबाबत निकाल येण्याच्या मार्गावर आहे. निवडणूका पुढे ढकलण्याबाबत संविधानात अधिकार नाही. जे काही हायकोर्ट आणि सर्वोच्च न्यायालय करते आहे, ते घटनेच्या विरोधात असल्याचेही ते म्हणाले.
 
जुन्या नगरपालिका, महापालिका, नगर परिषदा या पाच वर्षांच्या कालावधीनंतर विसर्जित करणे अपेक्षित आहे. त्यामुळेच नव्या सभागृहात पाच वर्षांनी ज्यांची सत्ता येणार त्यालाच पाच वर्षे करण्याचा पाच वर्षे राज्य करण्याचा मॅण्डेट आहे. राज्यात वारंवार कोविडच्या नावाखाली निवडणूका पुढे ढकलण्याचा भाग सुरू आहे. हा प्रकार चुकीचा असल्याचेही ते म्हणाले. उद्या देशात युद्ध जरी सुरू झाले, तरीही आपत्कालीन परिस्थिती जाहीर करायची झाली, तरीही निवडणूका पुढे ढकलता येत नाहीत. निवडणूकांच्या आधीच आम्ही आघाडी जाहीर करतो आहोत, असेही ते म्हणाले.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती