एकनाथ खडसे यांना मोठा दिलासा, पत्नी आणि जावयाला अंतरिम जामीन मंजूर

शनिवार, 23 मार्च 2024 (10:09 IST)
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. पुण्यातील भोसरी एमआयडीसी जमीन खरेदी-विक्री गैरव्यवहारप्रकरणी एकनाथ खडसे यांच्यासह त्यांच्या पत्नी आणि जावयाला उच्च न्यायालयाने अंतरिम जमीन मंजूर केला आहे. जमीन खरेदी-विक्री गैरव्यवहारप्रकरणी एकनाथ खडसे, त्यांची पत्नी मंदाकिनी खडसे आणि जावई गिरीश चौधरी यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली होती. तसेच इतर काही जणांवर आरोप आहेत.
 
भोसरी एमआयडीसी भुखंडाचे बाजार भावानुसार मुल्यांकन अधिक असताना ते कमी किंमतीत खरेदी केले होते, त्यामुळे न्यायालयाने एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांना समन्स बजावत, अटक करण्यासाठी आदेश जारी केले होते. न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात एकनाथ खडसे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. या प्रकरणात सहकार्य करण्याचे आणि चौकशीसाठी हजर राहणार असल्याचे आश्वासन दिल्यानंतर न्यायालयाने मंदाकिनी खडसे यांना अंतरिम जामीन 2 लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर मंजूर केला. तसेच गिरीश चौधरी यांनाही जामीन करण्यात आला आहे. दरम्यान, एकनाथ खडसे यांना याप्रकरणी याआधीच जामीन मंजूर करण्यात आला आहे.

Edited By -Ratnadeep Ranshoor

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती