भाजपाने शिवसेना फोडून एकनाथ शिंदेंना सोबत घेत महायुती सरकार स्थापन केलं. त्यानंतर, शिवसेनेतील मोठा गट भाजपासोबत गेल्यामुळे शिवसेना पक्षावर दाव करत एकनाथ शिंदेंनी पक्ष आणि चिन्ह मिळवलं आहे. निवडणूक आयोगानेच त्यांना पक्ष आणि चिन्ह दिल्यानंतर उद्धव ठाकरेंकडून एकनाथ शिंदेंवर सातत्याने निशाणा साधला जात आहे. तुमच्या बापाच्या नावाने मतं मागा, माझा बाप कशाला चोरता, असे म्हणत उद्धव ठाकरेंकडून शिंदेंना लक्ष्य केलं जात आहे. बाळासाहेब ठाकरे हे नाव बाजूला करुन तुम्ही मत मागा, असा सल्लाही ठाकरेंकडून भाजपाला देण्यात येत आहे. आज पुन्हा एकदा नांदेड येथील सभेतून उद्धव ठाकरेंनी भाजपावर हल्लाबोल केला.
''भाजपाचा सगळा खोटारडेपणा आहे. शेतकऱ्यांना पीकविमा मिळाला नाही, आपत्ती निवारण योजना मिळाली नाही. मोदींनी म्हटलं होतं, मी उत्पादन खर्च दुप्पट करेन, तोही झाला नाही. लागवडीचा खर्च वाढला आहे, खतांचा खर्च वाढला आहे. बियाणं तरी अस्सल मिळतंय का?,'' असा सवाल उपस्थित करत उद्धव ठाकरेंनी भाजपावर बोचरी टीका केली.
''अस्सल बियाणं भाजपातच नाही, तर ते शेतकऱ्यांना काय देणार. यांचं बियाणं सगळं बोगस आहे, हे सगळे बाहेरुन घेतात माणसं. आजही कोणीतरी घेतलंय त्यांनी. कारण, त्यांना माहितीय, महाराष्ट्रात मत मिळवायची असेल तर मोदी नावावर मत मिळत नाहीत. तर, आजही ते ठाकरे नावावरच मिळतात. म्हणून बाळासाहेबांचा फोटो चोरला, आज आणखी एक ठाकरे चोरायचा प्रयत्न करत आहेत, घेऊन जा..'' असे म्हणत उद्धव ठाकरेंना भाजपावर जोरदार हल्लाबोल केला. तसेच, राज ठाकरेंच्या महायुतीतील प्रवेशावरुन बोचरी टीकाही केली.