जनतेला वाटत असेल आम्ही एका विशिष्ट पक्षाशी, नेत्याशी लढा देतोय मात्र असे नसून आम्ही त्या नेत्याच्या पाठीशी असलेल्या शक्तीशी लढा देत असल्याचे सांगत काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींसह आरएसएसवर हल्लाबोल केला. मोदी केवळ चेहरा आहे. ५६ इंचाची छाती नाही, ते फक्त केवळ पोकळ व्यक्ती आहेत, असे म्हणत त्यांच्या पाठीशी असलेल्या शक्तीनेच मणिपूरमध्ये हिंसाचार घडविल्याचा आरोपही गांधी यांनी यावेळी केला.
काँग्रेस खासदार राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेचा समारोप शिवाजी पार्कवरच्या जाहीर सभेने झाला. यावेळी इंडिया आघाडीतील नेत्यांनी एकजूट दाखवित शक्तीप्रदर्शन केले. आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस नेते राहुल गांधी यांची रविवार दि. १७ मार्च रोजी मुंबईतील शिवाजी पार्कवर जाहीर सभा पार पडली असून इंडिया आघाडीतील दिग्गज नेत्यांनी दमदार शक्तीप्रदर्शन केले. या सभेला देशातील दिग्गज नेते उपस्थित असल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे संपूर्ण देशाचे लक्ष या सभेकडे लागले होते. विशेष म्हणजे शिवाजी पार्कवरील सभेच्या माध्यमातून काँग्रेस आणि इंडिया आघाडीच्या प्रचाराची सुरुवात केलीे.
मुंबईतील शिवाजी पार्कवर झालेल्या आजच्या सभेला राहुल गांधी, प्रियंका गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत, तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन, झारखंडचे मुख्यमंत्री चंपई सोरेन, बिहार विधानसभा विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव, जम्मू काश्मिरचे नेते फारुख अब्दुल्ला, महेबुबा मुफ्ती, विजय वडेट्टीवार, नाना पटोले, वर्षा गायकवाड, रेवांथ रेड्डी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासह अनेक दिग्गज नेते उपस्थित होते. यावेळी गांधी म्हणाले की लग्नासाठी १० दिवसात इंटरनॅशनल एअरपोर्ट सुरु झाला. मग देशात इतर ठिकाणी विमानतळ बांधायला एवढा वेळ का लागतो, असा सवाल राहुल गांधींनी विचारला आहे. ईव्हीएम शिवाय नरेंद्र मोदी निवडणूक जिंकू शकत नाहीत. विरोधी पक्षांना ईव्हीएम दाखवायला सरकार तयार नाही, असा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. २२ लोकांकडे देशाची सर्व संपत्ती एकवटली आहे, असे म्हणत राहुल गांधींनी मोदी सरकारवर घणाघात केला आहे.