हिंगोली : देशातील जनतेचे हजारो कोटी रुपये घेऊन कितीतरी चोरटे देशाबाहेर पळाले, परंतु एका तरी शेतकऱ्याने एखाद्या बँकेचे पैसे बुडविले का, असा सवाल( Shiv Sena) शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी कुटूंब संवाद यात्रे दरम्यान बोलतांना केला. हिंगोली जिल्ह्यात सोमवारी त्यांनी वसमत, सेनगाव व कळमनुरीत संवाद मेळावा घेतला. यावेळी त्यांच्या समवेत खासदार संजय राऊत, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, खासदार संजय जाधव, माजी मंत्री डॉ. जयप्रकाश मुंदडा, संपर्क प्रमुख बबनराव थोरात, नागेश पाटील आष्टीकर, माजी खासदार सुभाष वानखेडे,सहसंपर्क प्रमुख विनायक भीसे, जिल्हा प्रमुख गोपु पाटील सावंत, संदेश देशमुख, बाळासाहेब मगर आदी उपस्थित होते.
यावेळी उद्धव ठाकरे यांच्यासह व इतरांचा सत्कार करण्यात आला. या वेळी उद्धव ठाकरे यांनी बोलताना पुढे सांगितले की सर्व सामान्य शेतकऱ्याकडे बँकेचे कर्ज थकले तर शेतकऱ्याच्या दारावर नोटीसा चिटकविल्या जातात. जनतेचे हजारो कोटी रुपये घेऊन परदेशात पळून गेलेल्या बड्या उद्योजकांना कोणाचे आशिर्वाद आहेत, हे सर्वांनाच माहित आहे. अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी केंद्रातून भाजप सरकारवर निशाणा साधला. महाराष्ट्रातील उद्योग गुजरातकडे जात असताना सत्तेसाठी मिंथे झालेले कसे बोलतील, असा सवालही ठाकरेंनी केला. भारतीय जनता पक्ष हा मुळात गद्दारांचाच पक्ष आहे. ज्यावेळी त्यांचे देशात दोनच खासदार होते, त्यावेळी शिवसेनेने त्यांना ओळख मिळवून दिली. शिवसेना व महाराष्ट्रानेच भारतीय जनता पक्षाच्या फुग्यात हवा भरली. आता हा फुगा लवकरच फुटणार आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
अडीच वर्षे शिवसेनेला मुख्यमंत्री पद देण्याचे वचन
अमित शहांनी मातोश्रीवर येऊन दिले होते. तुळजाभवानीच्या पायाची शपथ घेऊन सांगितले. त्यावर फडणवीसांचा विश्वास नाही पण अमित शहांच्या बोलण्यावर त्यांचा विश्वास आहे, हा खोटारडेपणा आहे. शिवरायांनी महाराष्ट्राला शिकविले आहे की, कोणी पाठीत खंजीर मारण्याचा प्रयत्न केला तर अफजलखाना प्रमाणे त्याचा कोथळा काढावा. म्हणुन आम्ही भाजपचा कोथळा काढला आणि महाराष्ट्रात सरकार स्थापन केले. सेनगाव येथील सभेस माजी सभापती रूपालीताई पाटील गोरेगावकर, शिवसेना तालुकाप्रमुख संतोष देवकर, युवा सेना तालुकाप्रमुख जगु गाढवे पाटील, शहर प्रमुख जगन्नाथ देशमुख, प्रविण महाजन यासह शिवसेना पदाधिकाऱ्यांची व परिसरातील शिवसैनिकाची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.