आयपीएस मनोज कुमार शर्मा यांना बढती मिळाली आहे. शर्मा यांना महाराष्ट्र पोलीस दलात पोलीस महानिरीक्षकपदी नियुक्ती देण्यात आली आहे. यापूर्वी मनोज कुमार शर्मा हे डीआयजी म्हणजेच पोलीस उपमहानिरीक्षक पदावर कार्यरत होते, आता त्यांना आयजीपदी प्रमोशन मिळाले आहे. भारतीय पोलीस सेवेतील त्यांच्या या नियुक्तीमुळे त्यांचं अभिनंदन करण्यात येत आहे.
मनोज कुमार शर्मा यांनी अतिशय संघर्षातून स्पर्धा परीक्षांचा प्रवास पूर्ण केला. कधी काळी १२ वी नापास असलेल्या मनोज कुमार शर्मा यांनी युपीएससी परीक्षेतून थेट आयपीएस पदाला गवसणी घातली. त्यांच्या या संघर्षशाली आयुष्याचा प्रेरणादायी जीवनपट विधु विनोद चोप्रा यांच्या १२th फेल चित्रपटातून उलगडण्यात आला. त्यानंतर, मनोज कुमार शर्मा यांची संपूर्म कहानी आणि त्यांची लव्ह स्टोरीही चांगलीच चर्चेत आली. आता, नुकतेच त्यांना प्रमोशन मिळाले आहे. ऐन लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर त्यांना महाराष्ट्रात मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे, त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
कॅबिनेटच्या नियुक्ती समितीने २००३, २००४ आणि २००५ मधील आयपीएस अधिकाऱ्यांच्या प्रमोशनला मंजुरी दिली होती. त्यामध्ये, मनोज कुमार शर्मा यांना पोलीस महानिरीक्षकपदी बढती मिळाली आहे. यासंदर्भात स्वत: शर्मा यांनी सोशल मीडियातून ही माहिती दिली. तसेच, अभिनंदन करणाऱ्या सर्वांचे आभारही मानले. 'एएसपी पदापासून सुरु झालेला प्रवास भारत सरकारच्या ऑर्डरनुसार आज आयजी पदापर्यंत पोहोचला आहे. या लांब पल्ल्याच्या प्रवासात साथ देणाऱ्या सर्वांचे आभार... असे ट्विट मनोज कुमार शर्मा यांनी केले आहे.
दरम्यान, मनोज शर्मा यांनी याअगोदर महाराष्ट्रातील नागपूर, कोल्हापूर, नांदेड, गडचिरोली, चंद्रपूर तसेच मुंबईसह विविध ठिकाणी वेगवेगळ्या पदांवर काम केलेले आहे. त्यामुळे, गेल्या अनेक वर्षांपासून ते महाराष्ट्राच्या पोलीस सेवेत कार्यरत आहेत. संवेदनशील अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे.