बेळगाव सरकारी कार्यालये बंदमुळे नागरिकांचे हेलपाटे

शुक्रवार, 3 मार्च 2023 (07:55 IST)
बेळगाव ; सरकारी कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी बुधवारपासून बेमुदत संप पुकारला. त्यामुळे  सरकारी कार्यालयांमध्ये सर्वत्र शुकशुकाट पसरला होता. सरकारी कार्यालये बंद असल्यामुळे अनेकांना हेलपाटे खावे लागले. त्यामुळे नागरिकांतून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी सातवा वेतन आयोग लागू करावा, जोपर्यंत हा आयोग लागू केला जात नाही तोपर्यंत आम्ही संप मागे घेणार नाही, असा इशारा दिला. यामुळे सरकारी कार्यालये बंद होती. कोणीच कार्यालयात हजर नव्हते. त्यामुळे आता सरकारी कार्यालयांतील कामे पुन्हा प्रलंबित राहणार आहेत.
 
महापालिका, नगरपालिका, स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हाधिकारी कार्यालय व इतर सर्व सरकारी कार्यालयांमधील कर्मचाऱ्यांनी या संपामध्ये भाग घेतला होता. दररोज जिल्हाधिकारी कार्यालय, उपनोंदणी कार्यालय, प्रादेशिक आयुक्त कार्यालय, प्रांताधिकारी कार्यालय परिसरात मोठी वर्दळ असते. साऱ्यांचीच धावपळ सुरू असते. मात्र बुधवारी संप असल्याने या सर्वच कर्मचाऱ्यांनी दांडी मारली. ग्रामीण भागातील जनतेला याची अधिक माहिती नव्हती. त्यामुळे अनेकजण कामानिमित्त बेळगावला आले होते. मात्र त्यांना रिकाम्या हाती परतावे लागले. सरकारी कार्यालयांतील कामे कधीच वेळेवर होत नाहीत. त्यामुळे नेहमीच सरकारी कार्यालयांचा उंबरठा झिजवावा लागतो. त्यातच आता या कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्यामुळे साऱ्यांचीच कामे प्रलंबित राहणार, अशी चर्चा  सुरू होती. या संपामुळे सरकारच्या उत्पादनाचे मोठे नुकसान झाले आहे. या संपाला शिक्षकांनीही पाठिंबा दिला. त्यामुळे शाळा, महाविद्यालयेही बंद ठेवण्यात आली होती. सध्या शाळांमध्ये पूर्वपरीक्षा सुरू आहेत. मात्र या संपाला पाठिंबा दिल्यामुळे पूर्वपरीक्षाही पुढे ढकलण्यात आल्या आहेत.
Edited by : Ratnadeep Ranshoor

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती