दुसऱ्याच्या घरात मुलगा झाला म्हणून किती दिवस पेढे वाटणार? देवेंद्र फडणवीस

शुक्रवार, 3 मार्च 2023 (07:42 IST)
“असं आहे की ४०-४० लोकं त्यांच्या नाकाखालून निघून गेले तरीही उद्धव ठाकरे काहीही बोध घेत नाहीत. अजूनही अशीच वक्तव्यं उद्धव ठाकरे करत आहेत. खरंतर आज सर्वात जास्त आत्मचिंतन करण्याची वेळ कुणावर आली आहे तर ती उद्धव ठाकरेंवर आहे. त्यांचं काय राहिलं? पुण्यात त्यांना उमेदवार दिला नाही. पिंपरीत त्यांना सीट मिळाली नाही. दुसऱ्याच्या घरात मुलगा झाला म्हणून किती दिवस पेढे वाटणार? म्हणजे ठीक आहे पण हे किती दिवस करणार? त्यामुळे त्यांनी आत्मचिंतन करावं.” असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
 
संजय राऊत म्हणाले त्याला काय अर्थ आहे? आम्ही अमेरिकेची निवडणूक जिंकू शकतो असाही दावा ते करू शकतात असंही देवेंद्र फडणवीस यांन म्हटलं आहे. असल्या फाल्तू गोष्टी कशाला विचारता असं म्हणत त्यांनी हसत उत्तर देणं टाळलं.
 
कसबा निवडणूक निकालावर काय म्हणाले फडणवीस?
सातत्याने जिंकणारे कधीतरी हरले तर त्याचीच चर्चा जास्त होते. देशभरात भारतीय जनता पक्षाला जे यश मिळालं आहे त्याबद्दल मी पंतप्रधान नरेंद्र मोदी, जे.पी. नड्डा आणि अमित शाह यांचं सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो. देशभरात मोदीजींना समर्थन मिळतं आहे ही २०२४ ची नांदी आहे. महाराष्ट्रात दोन पोटनिवडणुका झाल्या. दोन्ही जागा आमच्याच येतील असं अपेक्षित होतं. मात्र कसबा पेठेत अतिशय चांगली मतं घेऊनही आम्ही विजयी झालो नाही. ४५ टक्के मतं आम्हाला मिळाली आहे असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Edited by : Ratnadeep Ranshoor

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती