'स्पेअर :प्रिन्स हॅरी यांच्या पुस्तकातील 12 दावे, ज्यांनी जगभर खळबळ उडवलीय
रविवार, 8 जानेवारी 2023 (16:20 IST)
प्रिन्स हॅरींचं 'स्पेअर' नावाचं आत्मचरित्र ब्रिटिश राजघराण्याबद्दल तक्रारी आणि आरोपांची मालिका यामुळे चर्चेत आहे.या पुस्तकात हॅरींनी केलेल्या खुलाशांमध्ये पत्नी मेघनबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांपासून ते भावाने केलेला हल्ला असो, किंवा अफगाणिस्तानात सेवा बजावत असताना 25 तालिबानी सैनिकांना ठार मारण्याची गोष्ट असो, तसेच लहान असताना ड्रग्जच सेवन असो, अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत.
मात्र, राजघराण्याशी संबंधित केन्सिंग्टन पॅलेस आणि बकिंगहॅम पॅलेस या दोघांनीही या आरोपांवर भाष्य करण्यास नकार दिलाय.
हे पुस्तक अधिकृतपणे 10 जानेवारीला विक्रीसाठी उपलब्ध होईल, पण बीबीसी न्यूजने स्पेनमध्ये एक प्रत मिळवली आहे, जिथे ते चुकून विक्रीसाठी गेले आहे.
1) कॅमिलाशी लग्न करू नये म्हणून वडिलांना केली होती विनंती...
हॅरी आपल्या आत्मचरित्रात लिहितात की, आता क्वीन कॉन्सोर्ट असणाऱ्या कॅमिला यांच्याशी लग्न करू नका अशी गळ प्रिन्स विल्यम आणि प्रिन्स हॅरी यांनी आपल्या वडिलांना घातली होती.
या आत्मचरित्राची स्पॅनिश आवृत्तीही प्रकाशित झाली आहे. द सन या वृत्तपत्राने या आत्मचरित्राचा हवाला देऊन म्हटलंय की, राजघराण्यात अधिकृतपणे सामील होण्यापूर्वी कॅमिला आणि प्रिन्स हॅरी तसेच प्रिन्स विल्यम यांच्या बैठका झाल्या होत्या.
या आत्मचरित्रात हॅरी म्हटलेत की, कॅमिला त्यांच्याशी दुष्ट सावत्र आईसारख्या वागतील का, यावर त्यांनी खूप दिवस चिंतन केलं. पण सरतेशेवटी त्यांचे वडील म्हणजे किंग चार्ल्स आनंदी राहणार असतील तर आम्ही दोघेही भाऊ त्यांना मोठ्या मनाने क्षमा करू असं ही या वृत्तपत्रात म्हटलंय.
मात्र बैठका कधी झाल्या किंवा त्यावेळी प्रिन्स हॅरी यांचं वय किती होतं याबद्दल कोणताही तपशील दिलेला नाही.
2) प्रिन्सेस ऑफ वेल्सचा मॅसेज पास करणारी स्त्री
प्रिन्सेस ऑफ वेल्स असलेल्या डायना या प्रिन्स हॅरी यांच्या आई होत्या. त्यांच्या मृत्यूनंतर हॅरी दुःखात बुडाले होते. यातून बाहेर येण्यासाठी त्यांना एका स्त्रीची मदत घ्यावी लागली होती. त्या स्त्रीकडे सत्ता असल्याचा दावा तिने केला होता.
त्या स्त्रीने हॅरीला सांगितलं होतं की, "तुझी आई म्हटली होती, की जसं तुझं आयुष्य आहे तसं जगता येणं तिला शक्य नव्हतं. तिने जे आयुष्य तुझ्यासाठी योजलं होतं तेच तू आज जगतोयस."
1997 साली पॅरिसमध्ये कार अपघातात डायनाचा मृत्यू झाला तेव्हा हॅरी 12 वर्षांचे होते.
हॅरी यांनी आपल्या दिवंगत आईचा दिलेला संदर्भ अगदीच थोडका असल्याचं गार्डियन वृत्तपत्रात म्हटलंय. त्यांनी सुद्धा पुस्तकाची एक प्रत मिळवली होती आणि गुरुवारी याचा थोडका सारांश प्रकाशित केला.
प्रिन्स हॅरीला ही स्त्री कुठे भेटली किंवा कोणत्या साली त्यांची भेट झाली याचा कोणताही तपशील आढळत नाही.
3) आईच्या मृत्यूनंतर वडिलांनी साधी मिठी सुद्धा मारली नाही...
आपल्या आत्मचरित्रात हॅरी आपल्या वडिलांविषयीची एक आठवण लिहितात. त्यांनी असं म्हटलंय की, कार अपघातात आईचा म्हणजेच डायना यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांचे वडील ही बातमी ब्रेक करण्यासाठी त्यांना उठवत होते.
एखादया सामान्य परिस्थितीही चार्ल्स यांना आपल्या भावना व्यक्त करता येत नसत. पण आईच्या मृत्यूनंतरही त्यांनी साधी प्रेमाने मिठी मारली नाही.
त्यानंतर हॅरींनी डायना यांच्या पॅरिस अपघाताची पुनरावृत्ती करून पाहिली. यातून त्यांना पडलेले प्रश्न सुटावेत अशी अपेक्षा होती. पण यातून मृत्यू संबंधीचं गूढ आणखीनच वाढलं.
4) आणि विल्यमने जमिनीवर ढकलून दिलं...
हॅरी यांनी त्यांच्या पुस्तकात दावा केलाय की, लंडन कॉटेजमध्ये असताना त्यांच्या भावाने विल्यमने त्यांची कॉलर पकडली, शर्टाचा गळा फाडला आणि त्यांना जमिनीवर ढकलून दिलं.
या पुस्तकात दोघा भावांमधील वादाविषयी लिहिण्यात आलंय. यात विल्यमने मेघनबद्दल केलेल्या वक्तव्यांमुळे वाद निर्माण झाला असल्याचा दावा हॅरी यांनी केलाय.
हॅरी लिहितात की, त्यांच्या भावाने मेघनवर "असभ्य" "उद्धट" आणि "आगाऊ"असल्याची टीका केली होती.
गार्डियन वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, प्रिन्स विल्यम हे प्रेस नॅरेटिव्हचे पोपट असल्याचं प्रिन्स हॅरी यांनी म्हटलं होतं.
भावाने जमिनीवर ढकलल्यानंतर पुढे काय घडलं याविषयी हॅरी लिहिता की, "त्याने पाण्याने भरलेला ग्लास खाली ठेवला, आणि मला दुसऱ्या एका नावाने हाक मारली. तो चालत माझ्याकडे आला, सगळं अगदी वेगाने घडत होतं."
"त्याने माझी कॉलर पकडली, शर्ट फाडला आणि मला जमिनीवर ढकलून दिलं."
"तिथं जवळंच कुत्र्याच्या खाण्याचा वाडगा होता. मी त्यावर पाठमोरा पडलो. त्या वाडग्याचे तुकडे झाले आणि ते माझ्या पाठीत शिरले. क्षणभर मी तसाच सुन्न पडून राहिलो, शेवटी मी कसंबसं उभा राहिलो आणि त्याला तिथून निघून जायला सांगितलं."
5) हॅरीने पहिल्यांदा सेक्स कधी केलं?
हॅरी लिहितात की, वयाच्या 17 व्या वर्षी ते एका पब मध्ये गेले होते. त्या पबच्या मागे असणाऱ्या शेतात त्यांनी त्यांच्यापेक्षा जास्त वय असलेल्या स्त्रीसोबत पहिल्यांदा सेक्स केलं.
ते सांगतात की, तो खूपच "अपमानास्पद" अनुभव होता. त्या स्त्रीने त्यांना नवशिक्यासारखी वागणूक दिली.
6) हॅरीच्या नाझी पोशाखावर विल्यम आणि कॅथरीन हसले
त्या आत्मचरित्रात विल्यम आणि कॅथरीन आपल्यावर हसल्याचा दावा हॅरींनी केलाय. 2005 मध्ये फॅन्सी ड्रेस पार्टी होती. यासाठी हॅरीने नाझी युनिफॉर्म परिधान केला होता.
हॅरी सांगतात, त्यांना पायलट आणि नाझी असे दोन युनिफॉर्म देण्यात आले होते. पण त्यांचं कशावरच एकमत होत नव्हतं. शेवटी विल्यम आणि कॅथरीन या जोडप्याला मत विचारण्यासाठी बोलवण्यात आलं.
"मी विल आणि केटला बोलावलं आणि त्यांचं मत विचारलं."
"त्यांनी नाझी युनिफॉर्म निवडला."
"मी एक छोटी मिशी आणि कपडे भाड्याने घेतले आणि घरी परतलो."
"पण नंतर विली आणि केट हसू लागले. विलीने चित्याचा पोशाख परिधान केला होता. पण माझा अवतार त्यापेक्षाही वाईट आणि त्याहूनही जास्त हास्यास्पद होता." हॅरी 20 वर्षांचे असताना 'नेटिव्ह आणि कॉलोनियल' थीम असलेली ही कॉस्च्युम पार्टी आयोजित करण्यात आली होती. त्यावेळचा हॅरीचा नाझी युनिफॉर्ममधला फोटो द सन या वृत्तपत्राने पहिल्या पानावर छापला होता.
7) 17 व्या वर्षात ड्रग्जचं सेवन..
हॅरी सांगतात, ते 17 वर्षांचे असताना त्यांनी ड्रग्ज घ्यायला सुरुवात केली होती. त्यांना एकाच्या घरी कोकेन ऑफर करण्यात आलं होतं. सोबतच त्यांनी बऱ्याचदा ड्रग्जचं सेवन केल्याचा उल्लेख आत्मचरित्रात करण्यात आलाय. पण या ड्रग्जच्या सेवनातून त्यांना कसलाच आनंद मिळाला नव्हता.
ते लिहितात, "यातून मला विशेष असं काही वाटलं नाही. बऱ्याच जणांना यातून आनंद मिळतो पण माझ्यात तशी भावना निर्माण झाली नाही. थोडक्यात यामुळे मी इतरांपेक्षा वेगळा असल्याची जाणीव मला झाली."
"मी केवळ 17 वर्षांचा मुलगा होतो. आणि मला ठरवून दिलेल्या गोष्टींपेक्षा वेगळं काहीतरी करायचं होतं."
हॅरी इटन कॉलेजमध्ये असताना, तिथल्याच एका बाथरुममध्ये त्यांनी गांजा ओढला होता. आणि विशेष म्हणजे त्यावेळी थेम्स व्हॅली पोलिस कॉलेजच्या इमारतीच्या बाहेरील भागात गस्त घालत होते. या पोलिसांना त्यांचे बॉडीगार्ड म्हणून नियुक्त करण्यात आलं होतं.
शिवाय 2016 साली कॅलिफोर्नियाच्या प्रवासादरम्यान हॅरीने मॅजिक मशरूम घेतल्याचं टेलीग्राफच्या वृत्तात म्हंटलय.
8) हॅरी इटनमध्ये आलेलं विल्यमला आवडलं नव्हतं
हॅरी लिहितात की, त्यांनी जेव्हा इटनमध्ये प्रवेश घेतला तेव्हा विल्यम त्यांना म्हणाले होते की, "मी तुला ओळखत नाही, आणि तू मला ओळखत नाहीस."
हॅरी सांगतात की, "त्यांच्या भावाने त्यांना सांगितलं होतं की, सुरुवातीची दोन वर्षे इटन त्यांच्यासाठी जणू एक अभयारण्यच होतं."
पण आता लहान भावाच्या येण्याने त्रास होईल. भाऊ प्रश्नांनी भंडावून सोडेल. सोबतच त्यांच्या मित्रमंडळीमध्ये येऊन तो सतत नाक खुपसत बसेल असं त्यांना वाटत होतं.
यावर हॅरी विल्यामला म्हणाले की, "तू काळजी करू नकोस, मी तुझा कोणीतरी आहे हे कोणाला सांगणार नाही."
9) माध्यमांच्या दबावात येऊन हॅरी आणि कॅरोलिन फ्लॅक दूर झाले
हॅरी सांगतात की, 2009 मध्ये ते मित्रांसह एका रेस्टॉरंटमध्ये गेले होते. तिथं टीव्ही प्रेजेंटर कॅरोलिन फ्लॅक सुद्धा आली होती. ती गोड होती. पण मीडियाला लगेच याची भनक लागली, आणि छायाचित्रकारांनी त्यांचा पिच्छा पुरवला.
माध्यमांनी या गोष्टीचा नुसता उच्छाद मांडला होता. काही तासांत पत्रकारांच्या जमावाने फ्लॅकच्या घराबाहेर, तिच्या मित्रांच्या घराबाहेर आणि तिच्या आजीच्या घराबाहेर तळ ठोकला.
"त्यानंतर देखील आम्ही एकमेकांना भेटत राहिलो, मात्र गोष्टी पाहिल्यासारख्या राहिल्या नव्हत्या. पण आम्ही थांबलो नाही, कारण आम्ही सोबत चांगला वेळ घालवला होता. आम्हाला त्या मूर्खांशी देणंघेणं नव्हतं."
"पण शेवटी त्या नात्याला बट्टा लागायचा तसा लागला होता. शेवटी तिच्या कुटुंबाखातर आम्ही थांबायचं ठरवलं आणि एकमेकांचा निरोप घेतला."
10) 25 तालिबान्यांना ठार केलं...
2012-13 मध्ये हॅरी अफगाणिस्तानमध्ये हेलिकॉप्टर पायलट म्हणून काम करत होते. ते एकूण सहा मिशन्स मध्ये सहभागी झाले होते.
ते लिहितात की, "या मिशन्स मध्ये मृत्यूचं तांडव होतं. मृतांची ही आकडेवारी अभिमानास्पद नव्हती, पण मला त्या गोष्टीची लाज देखील वाटली नाही. त्या युद्धात मी 25 लोकांचा विचार केला नाही. ते केवळ बुद्धीबळाच्या पटावरील प्यादे होते."
11) हॅरी आणि मेघनच्या लग्नावरून चेष्टा झाली
हॅरी सांगतात की, त्यांच्या आणि मेघनच्या लग्नाच्या तारखेवरून आणि ठिकाणावरून राजघराण्याने त्यांची चेष्टा केली होती.
हॅरीने सेंट पॉल कॅथेड्रल किंवा वेस्टमिन्स्टर अॅबेमध्ये लग्न करण्याच्या शक्यतेबद्दल भावाशी सल्लामसलत केली होती. यावर विल्यम म्हणाले की, हे शक्य नाहीये. कारण सेंट पॉल कॅथेड्रल इथं चार्ल्स आणि डायना यांचा तर वेस्टमिन्स्टर अॅबेमध्ये विल्यम आणि कॅथरीन यांचा विवाह सोहळा पार पडला होता.
यावर विल्यम यांनी लग्नासाठी कॉट्सवोल्ड्स मधील हायग्रोव्ह हाऊसच्या घराजवळ असलेलं चॅपल हॅरींना सुचवलं.
शेवटी हॅरी आणि मेघन यांनी मे 2018 मध्ये विंडसर कॅसल येथील सेंट जॉर्ज चॅपल मध्ये लग्नगाठ बांधली. हॅरी लिहितात, "2013 च्या उन्हाळ्याच्या शेवटी शेवटी मी एका वाईट त्रासातून जात होतो. मला पॅनिक अटॅक सुरू झाले होते."
त्यावेळी प्रिन्स असल्याने त्यांना अनेक मुलाखती, भाषणं दयावी लागत होती. हे करायला आपण असमर्थ असल्याचं त्यांना जाणवलं.
भाषणाच्या आधी त्यांचं संपूर्ण शरीर घामाने डबडबलेलं असायचं. त्यानंतर ते पॅनिक व्हायचे.
त्या दरम्यान मी माझा कोट चढवायचो आणि शूजची लेस बांधायचो. पण तोपर्यंत तो घाम माझ्या गालावर आणि पाठीवर ओघळलेला असायचा.
दोघा भावांनी भांडू नका अशी विनंती किंग चार्ल्स यांनी केली होती.
2021 मध्ये ड्यूक ऑफ एडिनबर्ग यांच्या अंत्यसंस्कारानंतर, हॅरीने आणि विल्यम यांच्यातील वाद उफाळून आला.
हॅरी सांगतात, यावेळी किंग चार्ल्स विल्यम आणि माझ्यामध्ये उभे राहिले आणि म्हणाले, "माझ्या शेवटच्या वर्षात मला दुःखी करू नका."
12) जास्तीचा वारस
हॅरी सांगतात की, मी 20 वर्षांचा असेन, तेव्हा मला एक गोष्ट सांगण्यात आली होती. माझा जन्म झाल्यावर चार्ल्स डायनाला म्हणाले होते की, "खूप छान...तू मला जास्तीचा वारस दिला आहेस. तू तुझं काम चोखपणे पार पाडलायस."
कधीच चुकवू नये असे पुस्तकातले तीन तपशील
हॅरी सांगतात की, मेघनला भेटण्यापूर्वी विल्यम आणि कॅथरीन यांना सूट्स मालिका आवडायची. मेघन या मालिकेत मुख्य भूमिकेत होती. जेव्हा हॅरीने मेघन गर्लफ्रेंड असल्याची ओळख उघड केली तेव्हा ते अवाक झाले.
हॅरी लिहितात की, त्यांच्या भावाने त्यांना इशारा दिला होता की, ती एक अमेरिकन अभिनेत्री आहे, काहीही होऊ शकतं.
हॅरी यांनी दावा केलाय की, मेघनशी लग्न करताना त्यांनी दाढी काढावी असं विल्यम यांनी सांगितलं होतं. मात्र महाराणींनी त्यांना दाढी ठेवण्याची परवानगी दिली होती.
हॅरी लिहितात, एका कार्यक्रमात मेघनने कॅथरीनला तिचं लिप ग्लॉस मागून नाराजी ओढवून घेतली होती. मेघनने ते लीप ग्लॉस बोटांवर घेतलं आणि ओठांना लावलं त्यावेळी कॅथरीन तिच्याकडे किळसवाण्या नजरेने पाहत होती.