मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी पत्राद्वारे राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुखांवर १०० कोटी रुपये वसुलीचे गंभीर आरोप केले. उच्च न्यायालयानेही या प्रकरणी दाखल करण्यात आलेल्या याचिकेची दखल घेत सीबीआय चौकशीचे आदेश दिले. तर राज्य सरकारने या आरोपांची समांतर न्यायालयीन चौकशी करण्यासाठी उच्च न्यायालयाचे निवृत्त न्या. चांदिवाल यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी आयोगामार्फत चौकशी सुरू केली आहे. मंगळवारी पार पडलेल्या सुनावणीदरम्यान, वाझेकडून बाजू मांडण्यात आली. मलिक यांच्याकडून अँटिलिया स्फोटकं परमबीर आणि आपला हात असल्याचा आरोप कऱण्यात आला होता. मात्र, ते आरोप चुकीचे असून त्यामुळे आपली प्रतिमा मलिन होत असल्याचे सांगत वाझेकडून आयोगासमोर मलिक यांनी केलेल्या वक्तव्यांची वृत्तपत्रांची कात्रणे दाखविण्यात आली. त्याची दखल घेत आय़ोगाने मलिक यांना समन्स बजावत १७ फेब्रुवारी रोजी आयोगासमोर हजर राहण्याचे निर्देश दिले.