कोरोना निर्बंध झाले आणखी शिथिल, लग्नासाठी 200 जणांना उपस्थित राहता येणार
मंगळवार, 1 फेब्रुवारी 2022 (16:51 IST)
कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने राज्य सरकारने नागरिकांवरील निर्बंध शिथिल केले आहेत. आजपासून नवे नियम अमलात येतील.
30 डिसेंबरपासून राज्यात निर्बंध कठोर करण्यात आले होते. 10 जानेवारीपासून दिवसा जमावबंदी तर रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली होती. मात्र आता कोरोनाचे आकडे आटोक्यात असल्याने नियम शिथिल करण्यात आले आहेत.
मुंबई, पुणे, भंडारा, सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरी, सातारा, सांगली, गोंदिया, कोल्हापूर आणि चंद्रपूर या 11 जिल्ह्यांचा 'अ' वर्गात समावेश करण्यात आला आहे.
18 वर्षांवरील 90 टक्के नागरिकांनी लशीचा पहिला डोस आणि 70 टक्के नागरिकांनी लसीचे दोन्ही डोस घेतले असतील अशा जिल्ह्यांचा 'अ' वर्गात समावेश करण्यात आला आहे.
काय आहेत नवे नियम, जाणून घेऊया
1. अंत्यसंस्कारांना उपस्थित राहण्याची मुभा
अंत्यसंस्कारासाठी 20 व्यक्तींची मर्यादा हटविण्यात आली असून, आता कितीही लोकांना उपस्थित राहता येईल.
2.थिएटर, नाट्यगृहं, थीम पार्कमध्ये उपस्थितीत सूट
करमणूक पार्क, थिमपार्क, जलतरण तलाव, वॉटर पार्क 50 टक्के क्षमतेने, उपाहारगृह, नाटय़गृह, चित्रपटगृहे स्थानिक प्राधिकरणाने निर्धारित केलेल्या वेळेत 50 टक्के क्षमतेने, मनोरंजनात्मक कार्यक्रम 50 टक्के क्षमतेने, खुल्या मैदानात किंवा सभागृहात क्षमतेच्या 25 टक्के किंवा 200 लोकांना प्रवेश देण्यास परवानगी देण्यात आली आहे. विशिष्ट भागातील कोरोनाची आकडेवारी लक्षात घेऊन स्थानिक प्रशासन हॉटेल, रेस्टॉरंट आणि नाट्यगृहांची वेळ ठरवणार आहे.
3. राष्ट्रीय उद्यानं, सफारी सुरू होणार
राज्यातील राष्ट्रीय उद्यानं, सफारी नियमित वेळेनुसार सुरू होणार आहे. ज्या पर्यटनस्थळांवर तिकीट आहे तीदेखील सुरू होणार आहेत. लशीचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांना तिथे प्रवेश असेल.
4.लग्नासाठी 200 जणांना उपस्थित राहता येणार
लग्न समारंभासाठी देखील २०० जणांना निमंत्रण देता येणार आहे. याआधी लग्नसोहळ्याला 50 जणांच्या उपस्थितीची परवानगी होती.
5.स्पा सेंटर, ब्युटी पार्लर, सलून 50 टक्के क्षमतेत सुरू होणार
वेलनेस इंडस्ट्रीचा भाग असलेले स्पा सेंटर्स नव्या नियमांनुसार 50 टक्के क्षमतेने सुरू राहतील.