सिंहस्थ कुंभमेळयाच्या पार्श्वभूमीवर नाशिकला स्वतंत्र कुंभमेळा अधिकार्यांची नियुक्ती करावी या आशयाचे पत्र नाशिक जिल्हाधिकार्यांनी राज्य शासनाला दिले आहे. यापूर्वी नाशिक कुंभमेळ्यासाठी नाशिकला स्वतंत्र कुंभमेळा अधिकारी नियुक्ती करण्यात आली होती. स्वतंत्र अधिकारी दिल्याने सिंहस्थाकरीता पुर्णवेळ नियोजन करणे सोयीचे ठरणार असल्याचे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी सांगितले.
2027 मध्ये सिंहस्थ कुंभमेळा होणार आहे. कुंभमेळ्याला पाच वर्षांचा कार्यकाळ असला तरी प्रशासकीय पातळीवर आत्तापासूनच तयारी करावी लागणार आहे. काही साधू- महंतांनी विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांची भेट घेऊन कुंभमेळ्यासाठी तयारी करण्याचे आवाहन केले होते. तत्कालीन आयुक्त डॉ. पुलकुंडवार यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली होती. सीएसटी कुंभमेळा समन्वय असे कमिटीचे नाव असून, समन्वय अधिकारी म्हणून शहर अभियंता शिवकुमार वंजारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आयुक्त समितीचे अध्यक्ष राहतील. कुंभमेळ्याची तयारी करताना विविध शासकीय विभागांशी समन्वय साधण्याचे काम समन्वय अधिकार्यांना करावे लागणार आहे. सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी करावयाची पूर्वतयारी कामांचे आराखडे तयार करणे, अंमलबजावणी उपाययोजनांसाठी यंत्रणा सज्ज करणे आदी कामे समितीमार्फत होतील. नाशिक महापालिकेने सिंहस्थ कुुंभमेळयाच्या अनुषंगाने तयारी सुरू केली आहे. आराखडा तयार करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.
नाशिक शहराबरोबरच त्र्यंबकेश्वर, सर्वतीर्थ टाकेद येथेही शाही पर्वणी होत असते. त्याचप्रमाणे देश, विदेशातून येणार्या साधु महंत, भाविकांसाठी प्रशासनाला व्यवस्था करावी लागते. कुंभमेळयासाठी सर्वंकष विकास आराखडा तयार करणे, जिल्हास्तरावर अधिकारी, साधू महंत आणि लोकप्रतिनिधी यांच्या विविध बैठकांचे आयोजन, राज्यस्तरावर विविध बैठकांसाठी माहिती तयार करणे, कार्यान्वियीन यंत्रणांशी पत्रव्यवहार करणे, शिखर समितीने तत्वतः मंजूर केलेल्या आराखडयानुसार करावयाच्या कामासाठी शासनाच्या विविध विभागाकडून निधी उपलब्ध करून देण्याबाबत पत्रव्यवहार करणे, कुंभमेळयाची कामे विहीत कालमर्यादेत पार पाडण्यासाठी स्वतंत्र अधिकार्यांची आवश्यकता असल्याने अपर जिल्हाधिकारी स्तरावरच्या अधिकारयाची नियुक्ती करण्याची मागणी शासनाला पत्राव्दारे करण्यात आली आहे.