गॅस पाईपलाईन च्या कामामुळे आणखी एक बळी !

मंगळवार, 7 जून 2022 (08:00 IST)
नगर औरंगाबाद महामार्गावर शेंडी शिवारात कंटेनरच्या झालेल्या अपघातात मुलगा जागीच ठार झाला तर आई गंभीर जखमी झाली आहे.गॅस पाईपलाईनच्या कामामुळे आणखी एक बळी गेल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू झाली असून नागरिकांमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे.
 
शेंडी शिवारातील वांबोरी फाटा नजीक गॅस पाईपलाईनचे पाईप घेऊन जाणा-या कंटेनरच्या (क्र. एम. एच. ०६ एक.क्यु. ६६२७) अपघातात बाबासाहेब काशिनाथ टेकाळे ( वय ४० रा. बीड) याचा जागीच मृत्यू झाला तर आई झुंबराबाई काशिनाथ टेकाळे (वय ६५) ही गंभीर जखमी झाली आहे.
 
पिंपळगाव माळवी येथील मेहेर बाबाच्या दवाखान्यांमध्ये हे मायलेक गेले होते. तेथून परतत असताना उभ्या असलेल्या कंटेनरच्या सावलीला हे माय लेक बसले असता वाहनचालकाने वाहन सुरू करून पुढे घेतल्याने मुलगा कंटेनर च्या टायरखाली सापडुन त्याचा जागीच मृत्यू झाला तर आई झुंबराबाई हिच्या पायावरुन कंटेनर गेल्याने ती गंभीर जखमी झाली आहे.
 
नगर-औरंगाबाद महामार्गावर सुरू असलेल्या गॅस पाइपलाइनच्या कामामुळे शेतकरी, व्यावसायिक यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्याचप्रमाणे अपघातात अनेक जणांचे बळी गेले असून देखील प्रशासन कारवाई करत नाही. यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती