पत्नीच्या आत्महत्येनंतर दीड महिन्याने दोन जुळ्या चिमुकल्यांसह पतीचीही आत्महत्या

गुरूवार, 9 सप्टेंबर 2021 (15:48 IST)
दीड महिन्यापूर्वी पत्नीने आत्महत्या केल्यानंतर तीन वर्षांच्या दोन जुळ्या मुलांना सांभाळायचे कसे या विवंचनेतून पतीनेही आपल्या दोन मुलांसह खाणीच्या पाण्यात उडी घेत आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना बुधवारी (दि. ८) सकाळी ११ वाजता सय्यदपिंप्री येथे उघडकीस आली. याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. शंकर गुलाब महाजन (३४) आणि पृथ्वी व प्रगती (वय ३ वर्षे) अशी मृतांची नावे आहेत.
 
याप्रकरणी पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सय्यदपिंप्री शिवारात खदान परिसरात पाण्यावर तीन मृतदेह तरंगताना नागरिकांना आढळून आले. पोलिसांनी मृतदेह पाण्याबाहेर काढले. काही अंतरावर दुचाकी, आणि चप्पल पडलेल्या आढळून आल्या. मृताजवळ असलेल्या आधारकार्डच्या आधारे ओळख पटली. हा मृतदेह शंकर महाजन (रा. भगतसिंगनगर, ओझर) यांचा आणि त्याच्या दोन जुळ्या मुलांचा असल्याचे निष्पन्न झाले. अधिक चौकशी केली असता मयत हे यावल (जळगाव) येथील रहिवासी होते. सध्या ते ओझर येथे वास्तव्यास होते. वरिष्ठ निरीक्षक सारिका आहिरराव यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरु आहे.
 
पत्नीने केली होती आत्महत्या :
मयत शंकर हे जऊळके येथे पत्नीसह वास्तव्यास होते. दोघेही कंपनीमध्ये नोकरी करत होते. कोरोनामध्ये नोकरी गेल्याने दोघे दाम्पत्य घरीच होते.
 
दीड महिन्यापूर्वी शंकर यांच्या पत्नीने आत्महत्या केली. दिंडोरी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद आहे. तेव्हापासून शंकर हे वैफल्यग्रस्त झाले होते. मिळेल तेथे बदली चालक म्हणून ते जात होते. मुलांना सांभाळ करण्यासाठी ओझर येथे राहणाऱ्या पत्नीच्या आईकडे ठेवत होते. सोमवारी (दि. ६) ते मुलांना घेऊन कुणास न सांगता घरातून निघून गेले. सय्यदपिंप्री शिवारात खदानमध्ये पाण्यात मुलांसह आत्महत्या केली, अशी माहिती पोलिसांनी दिली.
 
मृत्यूचे कारण स्पष्ट नाही:
मृतदेहाची ओळख पटली आहे. या मृताच्या पत्नीने दीड महिन्यापूर्वी आत्महत्या केली आहे. लहान मुलांचा सांभाळ कसा करावा यातून आत्महत्या केली असावी असा कयास आहे. अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. पुढील तपास सुरू आहे. तपासामध्ये कारण स्पष्ट होईल. – सारिका आहिरराव, वरिष्ठ निरीक्षक, तालुका पोलिस ठाणे तपास सुरु आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती