नाशिक वणीच्या यात्रेत सुमारे 2000 किलो भेसळयुक्त पेढा जप्त; एफडीएची कारवाई

मंगळवार, 23 एप्रिल 2024 (21:08 IST)
एफडीएने पुन्हा एकदा मोठी कारवाई केली असून, जिल्ह्यामध्ये साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेल्या वणीच्या यात्रेदरम्यान भेसळयुक्त 1944 किलो पेढा जप्त करण्यात आला आहे. त्याची किंमत सुमारे 5 लाख 83 हजार 800 रुपये आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली असून, ही कारवाई अशीच पुढे सुरू राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
 
अन्न व औषध प्रशासन, कार्यालयातर्फे धार्मिक स्थळांच्या यात्रेच्या ठिकाणी व चैत्रोत्सव 2024 निमित्त यात्रेच्या ठिकाणी होणारी गर्दी लक्षात घेता भेसळयुक्त अन्नपदार्थांवर कार्यवाही घेण्याबाबतची मोहीम हाती घेतली आहे. जनतेस दर्जेदार व भेसळीरहीत अन्न पदार्थ मिळवेत या करीता अन्न व औषध प्रशासन हे जागरुक आहे. त्याचाच भाग म्हणुन प्रशासनाद्वारे त्र्यंबकेश्वरनंतर जिल्ह्यातील कळवण तालुक्यातील वणी येथील सप्तशृंगगड, येथे अन्न सुरक्षा अधिकारी योगेश देशमुख, गोपाल कासार, प्रमोद पाटील,  उमेश सूर्यवंशी,  अ. उ. रासकर यांनी अचानक छापे टाकून तपासणी केली असता सप्तशृंगगडाच्या रोपवे संकुल परिसरात ग्राहकांची दिशाभूल करून मावा पेढे, कंदीपेढे, मलाई पेढे व कलाकंद पेढे हे दुग्धजन्य पदार्थांपासून तयार केले असल्याचे भासवून हलवा, कलाकंद, स्पेशल बर्फी व इतर तत्सम पदार्थ विकत असल्याचे आढळून आले.
 
या अन्नपुरवठा निरीक्षक अधिकाऱ्यांनी अभिषेक पेढा सेंटर येथे 200 किलो पेढा व इतर मिलावटी साहित्य जप्त केले आहे. त्याची किंमत 64 हजार 200 रुपये आहे. मयुरी पेढा सेंटर येथे 298 किलो पेढा याची किंमत 2 लाख 69 हजार 400 रुपये आहे. मयूर पेढा सेंटर येथे 53 किलो माल जप्त केला आहे त्याची किंमत 16500 रुपये आहे.
 
भगवती पेढा सेंटर येथे 592 किलो माल जप्त करण्यात आला आहे. त्याची किंमत 1 लाख 77 हजार 600 रुपये आहे. मे. भगवती पेढा सेंटर येथे 187 किलो मला जप्त करण्यात आला आहे. त्याची किंमत 56 हजार 100 रुपये आहे. असा एकूण 1944 किलो भेसळयुक्त पेढा, मलई पेढा नष्ट करण्यात आला असून, त्याची किंमत 5 लाख 83 हजार 800 रुपये आहे.
 
या कारवाईमध्ये अन्न सुरक्षा अधिकारी गो. वि. कासार, योगेश देशमुख, पी. एस. पाटील, अ. उ. रासकर, श्रीमती ए. ए. पाटील, उ. रा. सूर्यवंशी, श्रीमती सा. सु. पटवर्धन, तसेच अन्न सुरक्षा अधिकारी, धुळे येथील  की. ही. बाविस्कर व नंदुरबार येथील अन्न सुरक्षा अधिकारी आ. भा. पवार यांनी सहभाग घेतला.
 

Edited by -Ratnadeep Ranshoor
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती