नाशिकची जागा शिवसेनेलाच सुटेल, रामाचा धनुष्यबाण आमच्याकडेच राहील : दिपक केसरकर

बुधवार, 17 एप्रिल 2024 (20:33 IST)
नाशिक : नाशिकची जागा शिवसेनेलाच सुटेल, रामाचा धनुष्यबाण आमच्याकडेच राहील असा विश्वास शिंदे गटाचे मंत्री दिपक केसरकर यांनी व्यक्त केला. केसरकर यांनी रामनवमीनिमित्त नाशिकच्या काळाराम मंदिराला भेट देत दर्शन घेतले यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते.
 
यावेळी बोलतांना केसरकर म्हणाले, शिर्डी येथे रामनवमीचा उत्सव साजरा होतो. मी दरवर्षी शिर्डीला जात असतो. जिथे रामाचे पदस्पर्श झाले होते अशा नाशिकमध्येही रामाचा जन्मोत्सव साजरा होत आहे त्यामुळे आज मला येथे श्रीरामाचे दर्शन घेता आले हे मी माझे भाग्य समजतो. हिंदु संस्कृती ही शांततेची संस्कृती आहे.

मी मुंबईचा पालकमंत्री असतांना जर्मनीला गेलो होतो. तिथे चार लाख भारतीय मुलांना नोकर्‍या दिल्या जाणार आहेत. भारतीय संस्कृतीचा जगात मान्यता मिळवून देण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. त्यामुळे देशाच्या विकासासाठी आपल्याला पंतप्रधान मोदींचे हात अधिक बळकट करायचे असल्याचे ते म्हणाले. 
 
नाशिकच्या जागेबाबत विचारले असता ते म्हणाले, आता फार काळ वाट पाहण्याची आवश्यकता नाही. गुरूवारी महायुतीच्या नेत्यांची संयुक्त पत्रकार परिषद होणार आहे या परिषदेतून सर्व उमेदवार जाहीर केले जातील. आम्हाला विश्वास आहे की, रामाचा धनुष्यबाण आम्हाला मिळेल. धनुष्यबाण हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांच्या महाराष्ट्राचे प्रतिक आहे म्हणून ते तसेच राहीले पाहीजे. काही लोक प्रचारादम्यान काही खोटया गोष्टी खरया असल्याचे सांगत आहेत. राज्यात एक विकासाची लाट येते आहे परंतू ही लाट सहानुभुतीच्या बळावर थोपवण्याचे काम महाराष्ट्रात होते आहे. त्यामुळे आम्ही महाराष्ट्रातील जनतेसमोर सत्य परिस्थिती मांडणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Edited By - Ratnadeep Ranshoor 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती