भुजबळ यांनी घेतले श्री रामाचे दर्शन

बुधवार, 17 एप्रिल 2024 (20:20 IST)
रामनवमीच्या निमित्ताने नाशिकच्या प्रसिद्ध काळाराम मंदिरामध्ये आयोजित रामजन्मोत्सव सोहळ्यास राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी उपस्थिती लावली. यावेळी प्रभू श्रीरामाचे मनोभावे दर्शन घेत उपस्थित भाविकांना रामनवमीच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मुंबई अध्यक्ष समीर भुजबळ, डॉ.शेफाली भुजबळ, महंत सुधीरदास महाराज, भाजपचे नेते नितीन वानखेडे, विश्वस्त मंदार जानोरकर, मंगेश जानोरकर, समाधान जेजुरकर, चिन्मय गाढे यांच्यासह पदाधिकारी व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
 
गोडसे यांनी छगन भुजबळ यांच्या पाया पडून केला नमस्कार
श्रीराम नवमीनिमित्त नाशिकच्या काळाराम मंदिरात महायुतीमधील नाशिक लोकसभा मतदार संघासाठी इच्छुक असलेले विद्यमान खासदार हेमंत गोडसे व मंत्री छगन भुजबळ हे दोन्ही दर्शनासाठी आले होते. यावेळी खासदार हेमंत गोडसे यांनी छगन भुजबळ यांच्या पाया पडून केला नमस्कार केला. गोडसे आणि भुजबळ दोन्हीही नाशिक मधून लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुक असल्यामुळे त्यांच्या या भेटीची चर्चा चांगलची रंगली. 
 
या भेटीबाबत भुजबळ म्हणाले की, हेमंत गोडसे माझे मित्र आहेत. राम नवमीनिमित्त दर्शन घेण्यासाठी आलो असता, ते पण मंदिरात आले होते. त्यावेळी, मी त्यांना शुभेच्छा दिल्या, असे भुजबळ यांनी सांगितले.
 
ज्यांना उमेदवारी द्यायची असेल त्यांना द्या, पण 20 मे च्या आधी निर्णय घ्या.
मी निवडणुकानिमित्ताने चंद्रपूरमध्ये गेलो होतो आणि तेथील उमेदवारासाठी प्रचार करून आलो, असे सांगत नाशिकच्या उमेदवारीही भुजबळ यांनी भाष्य केलं. नाशिकसाठी ज्यांना उमेदवारी द्यायची असेल त्यांना द्या, पण 20 मे च्या आधी निर्णय घ्या. कारण, 20 मे चा मुहुर्त आहे, त्यामुळे त्या आधी निर्णय झाला तर बर होईल, अशा शब्दात भुजबळांनी संताप व्यक्त केला.  तसेच कुठल्याही पक्षाला नाशिकची जागा सोडा, पण 20 मे च्या आधी सोडा, असेही संतापजनक विधान भुजबळ यांनी केले. त्यामुळे, भुजबळांनी अप्रत्यक्षपणे महायुतीमधील वरिष्ठ नेत्यांना डेडलाईन दिल्याचं मंदिर दौऱ्यावेळी दिसून आल आहे.
 
नाशिक लोकसभेसाठी महाविकास आघाडीने ठाकरे गटाला जागा सोडली असून उमेदवारही घोषीत केला आहे. ठाकरे गटाचे उमेदवार माजी आमदार राजाभाऊ वाजे यांनी जोरदार प्रचारही सुरु केला. तरी महायुतीचा उमेदवार निश्चित होत नाही. या ठिकाणी जागा कोणत्या पक्षाला जाईल हेच कोणाला माहित नाही. महायुतीमधील तिन्ही पक्षांनी या जागेवर दावा केला आहे. 

Edited By - Ratnadeep Ranshoor 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती