कापूरबावडी पोलीस ठाण्यात संजय राऊत यांच्याविरोधात तक्रार गुन्हा दाखल

शुक्रवार, 24 फेब्रुवारी 2023 (08:08 IST)
मुंबई : महाराष्ट्रातील राजकारणात गेल्या काही दिवसांपासून विविध राजकीय घडामोडी घडत आहेत. सत्ताधारी आणि विरोधकांकडून एकमेकांवर टीकाटिप्पणी केली जात आहे. तसेच राज्यातील सत्तासंघर्षावरील सुनावणी सर्वोच्च न्यायालयात सुरु आहे. त्यात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर आरोप केले होते. त्यानंतर त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
श्रीकांत शिंदे यांची नाहक बदनामी केल्याचा आरोप करत शिवसेनेच्या ठाणे माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांनी ठाण्यातील कापूरबावडी पोलीस ठाण्यात संजय राऊत यांच्याविरोधात तक्रार दिली. मीनाक्षी शिंदे यांच्या तक्रारीनंतर संजय राऊत यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
काय आहे प्रकरण?
संजय राऊत यांनी दोन दिवसांपूर्वी ठाण्याच्या पोलीस आयुक्तांना पत्र लिहून आपल्याला मारण्याचा कट केला जात असल्याचे म्हटले आहे. या पत्रात म्हटल्याप्रमाणे हा कट खासदार श्रीकांत शिंदे यांनी स्थानिक कार्यकर्ता असलेल्या राजा ठाकूर यांना सांगितले असल्याचे त्यामध्ये नमूद केलेले होते. यामुळेच खासदार शिंदे यांच्यावर सुपारी दिल्याचा आरोप खासदार राऊत यांनी केल्यानंतर राऊत यांनी केलेल्या वक्तव्याविरोधात  मीनाक्षी शिंदे यांनी तक्रार दाखल केली. त्यानंतर आज संजय राऊत यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल
कापूरबावडी पोलीस ठाण्यात संजय राऊत यांच्या विरोधात विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. खासदार श्रीकांत शिंदे यांची बदनामी केली, समाजात तेढ, वैमनस्य निर्माण करणे, खोटे पत्र देणे म्हणून तक्रार केली होती, याच अंतर्गत गुन्हा करण्यात आला आहे.

Edited by-Ratnadeep Ranshoor
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती