माझे आजोबा विचार करतील की, गद्दारांच्या हस्ते माझ्या तैलचित्रांचे अनावरण होत आहे, आदित्य ठाकरे यांची शिंदे गटावर टीका

सोमवार, 23 जानेवारी 2023 (08:32 IST)
विधिमंडळात बाळासाहेब ठाकरेंच्या तैलचित्राचे अनावरण करण्यात येणार आहे. मात्र, यावेळी उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे आमने सामने येणार का? याची जास्त चर्चा रंगली आहे. तसेच, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी हा भाजप हा राजकीय कार्यक्रम असल्याची टीका केली. तर, आदित्य ठाकरे यांनीदेखील या कार्यक्रमाबद्दल आपले मत स्पष्ट करत शिंदे गट आणि भाजपवर टीका केली.
 
शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे म्हणाले की, "माझे आजोबा विचार करतील की, गद्दारांच्या हस्ते माझ्या तैलचित्रांचे अनावरण होत आहे. एका घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे" असा टोला त्यांनी लगावला आहे. ते पुढे म्हणाले की, "एका माणसाच्या राक्षसी महत्वकांक्षेमुळे राज्य मागे गेले. जेवढे ते खालच्या पातळीवर जातील, तेवढे आपण मोठ्या उंचीवर जाणार आहोत. कशाची भीती होती म्हणून सुरतला पळून गेलात? तुम्ही असे काय खाल्ले होते, की जे अपचन झाल्यानंतर पचन होण्यासाठी एवढ्या दूर जावे लागले? ही टोळी उद्योगांमध्ये घुसल्यानंतर आपले काही खरे नाही, म्हणून उद्योग राज्याबाहेर जात आहेत." अशी घणाघाती टीका त्यांनी केली.
 
२३ जानेवारीला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त राज्यभरात वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहेत. तसेच, विधिमंडळामध्ये बाळासाहेब ठाकरेंच्या तैलचित्राचे अनावरण करण्यात येणार असून अनेक नेते यासाठी उपस्थित राहणार आहेत.
 
Edited By- Ratnadeep Ranshoor

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती