यवतमाळमध्ये ४८ तासांत ६ शेतक-यांची आत्महत्या

बुधवार, 27 डिसेंबर 2023 (08:28 IST)
दुष्काळ आणि सततच्या नापिकीने त्रस्त झालेल्या 6 शेतक-यांनी यवतमाळ जिल्ह्यात गेल्या 48 तासांत आत्महत्या केल्या आहेत. सरकार सत्तेत आल्यापासून आत्महत्यामुक्त महाराष्ट्र करण्याच्या घोषणा करीत आहेत मात्र शेतकरी आत्महत्येच्या वाढत्या घटना पाहता सरकारने केलेल्या घोषणा हवेतच विरल्याची टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली.
 
विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी माध्यम प्रतिनिधींशी विविध विषयांवर संवाद साधला. शेतकरी आत्महत्यांबाबत बोलताना ते म्हणाले की, अवकाळी पावसाच्या नुकसानभरपाईची मदत अद्याप शेतक-यांना मिळाली नाही. सरकारने जाहिरातींद्वारे प्रसिध्द केलेले आकडे हे कागदावरच राहिले आहेत. विश्वगुरू म्हणून मिरवणारा भाजप जनतेचे प्रश्न सोडविण्यात सपशेल अपयशी ठरला आहे म्हणूनच भाजप सध्या ते राम मंदिराच्या मुद्यावरून भावनिक फुंकर घालून राजकारण करीत आहेत, अशी टीका दानवे यांनी केली. इंडिया आघाडी भ्रष्टाचार, बेरोजगारी, महागाई यावर निवडणुका लढणार असल्याचे त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.
 
Edited By-Ratnadeep Ranshoor

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती