राज ठाकरेंनी वसंत मोरेंना पदावरुन तडकाफडकी हटवण्याचे 3 अर्थ
शुक्रवार, 8 एप्रिल 2022 (13:01 IST)
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सालाबादप्रमाणे गुढी पाडव्याच्या दिवशी शिवाजी पार्कवर सभा घेतली.
स्वाभाविकपणे या सभेनंतर राजकीय प्रतिक्रिया, आरोप-प्रत्यारोप यांना वेग आला. पण यंदाच्या वर्षीच्या या सभेनंतर केवळ मनसे पक्षाबाहेरच नव्हे तर पक्षांतर्गतही खळबळ माजल्याचं दिसून आलं.
राज ठाकरे यांच्या भाषणानंतर नाराज होऊन पुण्यातील एका मुस्लीम कार्यकर्त्यांने आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्याविषयी माध्यमांमध्ये चर्चा झाली.
त्यानंतर राज ठाकरे यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे मनसे पुणे शहराध्यक्ष आणि नगरसेवक वसंत मोरे यांनीही आपल्या पक्षाच्या भूमिकेशी फारकत घेतली.
याच मुद्द्यावरून पक्षाशी विसंगत भूमिका घेतल्याप्रकरणी वसंत मोरे यांना पदावरून तत्काळ दूर करण्यात आलं.
या सगळ्या घडामोडींनंतर विविध चर्चांना ऊत आला आहे. ठाकरे यांच्या या धडक निर्णयाचे काही छुपे अर्थ असल्याचं राजकीय विश्लेषक सांगतात. हे संपूर्ण प्रकरण कोणत्या दिशेने जातं, हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.
गुढी पाडव्याच्या दिवशी (2 एप्रिल) मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभेचं आयोजन शिवाजी पार्क येथे करण्यात आलं होतं. कोरोनामुळे गेली दोन वर्षे त्यांची ही सभा होऊ शकली नव्हती, त्यामुळे या सभेत राज ठाकरे काय बोलणार याची सर्वांना उत्सुकता होती.
सभेदरम्यान आपल्या भाषणात राज ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकारला निशाण्यावर घेत प्रखर हिंदुत्वाचा मुद्दा मांडला.
राज आपल्या भाषणात म्हणाले, "माझी पंतप्रधान नरेंद्र मोदींना विनंती आहे. तुम्ही ईडी, इन्कम टॅक्सच्या धाडी टाकताय ना, पोलिसांना विचारा. झोपडपट्ट्यांतल्या मदरशांवर धाडी टाका. काय काय हाती लागेल, ते पाहा.
ते पुढे म्हणाले, "माझा प्रार्थनेला विरोध नाही, पण मशिदींवर लागलेले भोंगे उतरवावेच लागतील. ज्या मशिदीबाहेर भोंगे लागतील त्याच्यासमोर दुप्पट आवाजात स्पीकर लावायचे आणि हनुमान चालिसा लावायची. मी धर्मांध नाही, धर्माभिमानी आहे. धर्म बनला तेव्हा लाऊडस्पीकर होता का? बाहेरच्या देशांत दिसतात का?"
पक्षांतर्गत खळबळ
राज ठाकरे यांच्या भाषणानंतर राज्यातील सर्वपक्षीय नेत्यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या. भाजपने त्यांच्या या नव्या भूमिकेचं स्वागत केलं. तर महाविकास आघाडीतील नेत्यांनी त्यांच्यावर हल्लाबोल केला.
दरम्यान, भाषणाच्या दुसऱ्याच दिवशी राज ठाकरे यांना पक्षातूनच धक्के बसण्यास सुरुवात झाली. पुण्यातील एका मुस्लीम कार्यकर्त्याने आपल्या सर्व पदांचा राजीनामा दिला. पुण्यात शाखा अध्यक्ष असलेल्या माजिद अमीन शेख यांनी उघड नाराजी व्यक्त करत थेट पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.
याव्यतिरिक्त, इतर अनेक कार्यकर्ते राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत, अशी माहितीही समोर आली.
त्याच्या दोन-तीन दिवसांनी मनसे पुणे शहराध्यक्ष वसंत मोरे यांच्या भूमिकेबद्दलही बातमी समोर आली. याच बातमीने मनसेला सर्वात मोठा धक्का बसला.