पुणेरी पाट्या, पुणेरी विनोद यासह विविध कारणांमुळे चर्चेत असतात. मात्र, पुणेकरांनी थेट देवालाही सोडलेले नाही. सोट्या म्हसोबा, खुन्या मुरलीधर, बटाट्या मारुती, डुल्या मारुती अशी विविध नावे ठेवून पुणेकरांनी देवालाही पुणेरीपणा दाखवला अशी खोचक टिपण्णी उपमुख्य अजित पवार यांनी केली. वारजे येथील डुक्कर खिंडीजवळ वनविभागाच्या 35 एकर जागेत पुणे महानगरपालिका व वन विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने संजीवन वन उद्यान उभारण्यात येत आहे, या प्रकल्पाचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाले.
पुणे महानगरपालिका व वन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने विकसित करण्यात येणारे संजीवन वन उद्यान ऑक्सिजन पार्क म्हणून नावारूपाला येईल, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी केले. पुणे महानगर परिसरात वनविभागाच्या टेकड्या व जागा आहेत, त्याठिकाणीही वृक्षारोपण करताना देशी वृक्षारोपणाला प्राधान्य द्यावे, अशा सूचनाही त्यांनी यावेळी केल्या.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, पुणे महानगरपालिका व वन विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने विकसित संजीवन वन उद्यान एका देखण्या उद्यानात रूपांतर हे जैवविविधता संवर्धनाचे आदर्श उदाहरण ठरेल. जैवविविधता जोपासणारे हे उद्यान ऑक्सिजन पार्क म्हणून नावारूपाला येईल. सौंदर्यीकरण, प्रदूषण नियंत्रणाबरोबरच वारजे, कोथरूड परिसरातील नागरिकांसाठी एक चांगला ऑक्सिजन पार्क तयार होईल. महानगरालगतच्या टेकड्या व मोकळ्या वनजमिनींवर वन विभागाने वृक्षारोपणाचे नियोजन करावे व अशा कामांना गती द्यावी, तसेच वृक्षारोपन करताना देशी वृक्ष लागवडीला प्राधान्य दयावे, असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.
संजीवन वन उद्यान प्रकल्पामुळे पर्यावरण संवर्धनास मदत होणार असल्याचे सांगून उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, संजीवन वन उद्यानामध्ये विविध प्रकारचे वृक्ष पाहण्यास मिळणार आहे. या उद्यानात येणाऱ्या नागरिकांना चांगली हवा मिळणार आहे. कोरोनामुळे ऑक्सिजनचे महत्त्व सर्वांनाच समजले आहे. त्यासाठी आपण अनेक ऑक्सिजन प्लांट्स तयार केले. मात्र हा नैसर्गिक प्लांट असून हे टिकवणे गरजेचे आहे. अन्यथा भावी पिढी आपल्याला माफ करणार नाही. त्यामुळे वृक्षारोपनासाठी लोकसहभाग अत्यंत महत्त्वाचा असल्याचेळी त्यांनी सांगितले.