पिंपरी-चिंचवड महापालिकेचे स्थायी समिती सभापती यांच्यासह 4 कर्मचाऱ्यांवर पोलिसांच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई करत त्यांना अटक केली.यामागे खूप मोठा राजकीय हस्तक्षेप आणि षडयंत्र असून, अॅड. नितीन लांडगे यांना नाहक गोवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे,असा दावा पिंपरी-चिंचवड भाजप शहराध्यक्ष आणि आमदार महेश लांडगे यांनी केला.
पिंपरी – चिंचवड महापालिका स्थायी समिती सभापतींच्या कार्यालयावर पोलिसांच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) धाड टाकली. रोकड, कागदपत्रे ताब्यात घेत स्थायी समिती सभापती अॅड. नितीन लांडगे, त्यांचे स्वीय सहाय्यक ज्ञानेश्वर पिंगळे आणि तीन कर्मचाऱ्यांची चौकशी केली. पंचनामा, जाबजबाब घेत सभापती आणि चार कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली.या पार्श्वभूमीवर भाजपचे शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे, माजी शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप आणि प्रवक्ते अमोल थोरात यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
या वेळी महेश लांडगे म्हणाले की, अतिशय खालच्या थराला जाऊन पिंपरी-चिंचवडमध्ये राजकारण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. अँटी करप्शन विभागाने कारवाई कोणत्या आधारावर केली, हे अजून स्पष्ट झालेले नाही. केवळ तक्रार केली म्हणून कारवाई केली, हे अपेक्षित नाही. कोणताही लेखी पुरावा नसताना, एखादे कॉल रेकॉर्ड नसताना कोणत्या आधारावर कारवाई केली.अॅड. नितीन लांडगे अतिशय स्वच्छ आणि समाजसेवेचा वारसा असलेल्या परिवारातील व्यक्तिमत्व आहे ते राजकारणात केवळ आणि केवळ समाजसेवा म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्याकडून अशी कोणतीही गोष्ट होणे शक्य नाही.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदावर भाजपाच्या अनेक नगरसेवकांनी सभापती म्हणून काम केले आहे आणि या पदाचा मान वाढविण्याचे काम केले आहे. स्थायी समिती सभापती पदावर काम करताना या शहरासाठी चांगले काय होईल एवढाच विचार भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी केलेला आहे, असे असताना इतक्या खालच्या थराला जाऊन राजकारण करणे हे अतिशय निंदनीय आहे.