महिलेचा चाकू घेऊन लसीकरण केंद्रावर हंगामा, महिलेवर गुन्हा दाखल

गुरूवार, 19 ऑगस्ट 2021 (17:08 IST)
कोरोना प्रतिबंधात्मक लसीमुळे लोकांचे मृत्यू होतात या अफवेमुळे पुण्यातील एका महिलेने चाकू घेऊन लसीकरण केंद्रावर हंगामा घातल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या महिलेने लसीकरण केंद्रावर अक्षरशः चाकू घेऊन धुडगूस घातला आणि मग तिथून तिने पलायन केले. याप्रकरणी महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला असून सध्या पोलीस तिचा शोध घेत आहेत.
 
पुण्यातील पिंपरी चिंचवडमधील लसीकरण केंद्रावर हा धक्कादायक प्रकार घडला आहे. काल, बुधवारी सकाळी नेहरुगनरच्या विठ्ठलनगर बिल्डिंग नंबर सहावरील लसीकरण केंद्रावर महिला चाकू घेऊन गेली. ही संबंधित महिला विठ्ठलनगर बिल्डिंग नंबर दोनमध्ये राहणार होती. लसीमुळे लोकांचा मृत्यू होतो, अशी तिच्या मनात भीती होती. त्यामुळे महिला थेट लसीकरण केंद्रावर चाकू घेऊन गेली आणि केंद्रावरील सेल्फी पॉईंट चाकूने फाडले. एवढेच नाहीतर तिने केंद्रावर उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांना खुर्ची आणि हाताने मारहाण केली. तसेच तिने खुर्च्या तोडत सर्वांना शिवीगाळ केली आणि लसीकरण बंद करण्याची धमकी दिली. त्यानंतर ही महिला तिथून पसार झाली. पण लसीकरण केंद्रावरील महिला कर्मचारीने या महिलेविरोधात पिंपरी पोलिसांकडे तक्रार दाखल केली. त्यामुळे महिलेवर सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या पोलीस या महिलेचा शोध घेत आहेत.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती