देशभरातील कोरोना लसीकरण मोहीमेने दोन महिन्यांचा टप्पा पूर्ण केला आहे. सुरुवातीला लसीकरणाला कमी प्रतिसाद मिळत होता, मात्र आता नागरिक स्वतःहून लसीकरणासाठी येताना दिसत आहे. कोरोनाग्रस्तांची संख्या वाढू लागल्याने लसीकरणाचा वेग वाढवण्याचा प्रयत्न केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर लसीकरण वाढविल्यास पुणे शहरातील सर्व नागरिकांचे लसीकरण दोन महिन्यात पूर्ण होईल, असा विश्वास महापौर मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केला.
पुण्यातील रुग्ण संख्या नियंत्रणात न आल्यास भविष्यात नव्याने पावलं उचलली जाऊ शकतात, असा इशारा देतानाच नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळावे, तसेच सर्व नियमांचे पालन करावे, असे आवाहन देखील महापौरांनी केले.
रुग्ण संख्या वाढल्याने पुण्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. महानगरपालिका क्षेत्रात सर्व प्रकारचे सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय व धार्मिक कार्यक्रमास पुढील आदेशापर्यंत संपूर्ण प्रतिबंध राहणार आहेत. तसेच, लग्नसमारंभ कार्यक्रम 50 लोकांच्या उपस्थितीत करण्यास परवानगी राहील. अंत्यसंस्कार दशक्रिया व त्या निगडित कार्यक्रम 20 लोकांच्या उपस्थितीत करण्यास परवानगी राहील.