काही तरुण रात्री उशिरा फिरत होते. त्यांना भूक लागल्याने ते चायनीज गाडीवर थांबले. मात्र, गाडी बंद करण्यात आली होती. यावेळी तरुणांनी चायनीज विक्रेत्याशी वाद घातला. तुझ्यामुळे इकडे आलो. हा चायनीजवाला बंद आहे. आता काय खाऊ. तो चायनीजवाला बंद झाला असताना देखील काहीतरी करुन देणार होता. परंतु आम्ही इकडे आलो, आता आम्ही उपाशी राहू का, तुला दाखवतोच, असे म्हणत टोळक्याने तरुणावर कोयत्याने हल्ला केला, अशी माहिती हल्ला झालेल्या तरुणाने पोलिसांना दिली.
आपल्यावर कोयताने वार करून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी संतोष बाळू गायकवाड ( २८, रा. रायकरमळा, धायरी) यांने सिंहगड रोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी राजन शहा ऊर्फ पांड्या, रोशन पोकळे, वैभव ऊर्फ गोट्या तरंगे, विक्या चव्हाण यांना अटक करण्यात आली आहे. ही घटना रायकर मळा येथील वृंदावन सोसायटीचे लेनमध्ये घडली. फिर्यादी आणि आरोपी हे एकमेकांच्या ओळखीचे आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली.
आरोपी हे मारुती मंदिरासमोरील ड्रॅगन चायनीजवाल्याशी भांडण करत होते. मध्यरात्री हा प्रकार सुरु असल्याने फिर्यादी तेथे गेला. त्याने आरोपींना सिल्व्हरबर्च हॉस्पिटल शेजारच्या चायनीजवाल्याकडे चला. आपण नूडल्स खाऊयात, असे बोलून त्यांना घेऊन तो वृंदावन सोसायटीच्या गल्लीत आला. परंतु, तेथील चायनीज बंद होते. त्यामुळे आरोपींनी फिर्यादीला शिवीगाळ करुन हाताने मारहाण केली.कोयत्याने फिर्यादीच्या डोक्यात वार करुन त्याला गंभीर जखमी केले.