मराठी कलाकारांचा अपमान, सचिन अहिर यांचा आरोप, मात्र राहुल देशपांडे यांनी फेटाळले आरोप

शुक्रवार, 21 ऑक्टोबर 2022 (15:32 IST)
भारतीय जनता पार्टीच्या वतीने यंदा दिवाळीनिमित्त वरळीच्या जांबोरी मैदानात आयोजित ‘मराठी सन्मानाचा आपला मराठमोळा दीपोत्सव’ कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. भाजपाच्या या कार्यक्रमात मराठी कलाकारांचा अपमान होत असल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते सचिन अहिर यांनी केला. ट्विटरवर त्या कार्यक्रमातील एक व्हिडीओ शेअर करत सचिन अहिर यांनी हा आरोप केला आहे. मात्र सचिन अहिर यांचे हे आरोप प्रसिद्ध गायक राहुल देशपांडे यांनी फेटाळल्याचे समजते.
 
भाजपाकडून ‘मराठी सन्मानाचा आपला मराठमोळा दीपोत्सव’ कार्यक्रमात गायक राहुल देशपांडे आपलं गाणं सादर करत होते. त्यावेळी बॉलिवुड अभिनेता टायगर श्रॉफ या कार्यक्रमस्थळी पोहोचला. त्यामुळे त्याचा सत्कार करण्यासाठी राहुल देशपांडे यांना भाजपा आमदार मिहीर कोटेता यांनी काही वेळासाठी गाणे थांबवण्यास सांगितले.
 
या सर्व घटनेचा व्हिडीओ ठाकरे गटाचे नेते सचिन अहिर यांनी ट्विटरवर शेअर केला आणि ‘हाच का मराठी कलाकारांचा सन्मान’, ‘मराठी कलाकारांची चेष्टा’ असे त्यांनी लिहिले. तसेच, भाजपाकडून मराठी गायक राहुल देशपांडे यांचा अपमान करण्यात आल्याचा आरोप केला. 
 
यावरुन आरोप-प्रत्यारोप सुरु असतानाच राहुल देशपांडे यांनी हे सर्व आरोप फेटाळल्याचे समजते. एका वृत्तवाहिनीशी बोलताना देशपांडेंनी प्रतिक्रिया दिली आहे. “इतकी काही मोठी गोष्ट घडलेली नाही. मला काही अपमान वैगेरे वाटलेला नाही. मला हा विषय इतकं बोलण्यासारखा वाटत नाही”, असे सांगत त्यांनी चर्चांना पूर्णविराम दिला आहे.
Edited By- Ratnadeep Ranshoor

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती