पुणे: ढोले पाटील एज्युकेशन सोसायटी-खराडी, मधील ढोले पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग च्या शिवदुर्ग दर्शन समितीची किल्ले रोहीडा मोहीम मोठ्या जल्लोषात पार पडली. ढोले पाटील एज्युकेशन सोसायटी चे सन्माननीय चेअरमन श्री. सागर उल्हास ढोले पाटील यांच्या मार्गदर्शना अंतर्गत, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांचा वारसा आजच्या युवा पिढीच्या मनात रुजवण्यासाठी या समितीची स्थापना करण्यात आली आहे व महाराजांच्या स्वराज्याचे साक्षीदार असणाऱ्या गड किल्ल्यांचे दर्शन तथा संवर्धन कार्य या समिती अंतर्गत केले जाते.
या मोहिमेमध्ये विद्यार्थ्यांनी श्री शिवदुर्ग संवर्धन पुणे यांच्यासोबत मिळून गडावरती येणाऱ्या पर्यटकांची गैरसोय होऊ नये म्हणून स्वच्छतागृह बनवण्यासाठी ची सामग्री गडाच्या पायथ्यापासून ते गडाच्या शिखरापर्यंत नेऊन पोहोचवली.त्याच प्रमाणे "आज जर छत्रपती शिवाजी महाराज, जिजाऊ माँसाहेब, बाजी प्रभू आणि मावळे जर गडावर असते तर” या विषयावर शूट झालेल्या शॉर्ट फिल्म मध्ये कु. वैष्णवी बंगळे या विद्यार्थिनीने जिजाऊ माँसाहेब यांची मुख्य भूमिका साकारली.
शिवदुर्ग समितीचा विद्यार्थी प्रतिनिधी चि. वेदांग संतोष जाधव, याच्या नेतृत्वाने एकूण ३१ सदस्यांनी गडावर असलेल्या झाडांना आळा करणे, पाणी देणे, गवत साफ करणे अशी वृक्ष संवर्धन कार्य केली. तसेच वाघजाई बुरुज, शिरवले बुरुज, सर्जा बुरुज, रोहिडमल्ल मंदिर या भागातील कचरा, प्लास्टिकच्या बॉटल्स विद्यार्थ्यांनी गोळा केल्या. सर्वांना नाश्ता व जेवणाची सोय श्री शिवदुर्ग संवर्धन संस्थेतर्फे करण्यात आली होती. सर्वांनी एकत्र येऊन स्वयंपाक बनवला व भोजनाचा आनंद घेतला. मोहिमेची सांगता गडफेरी करून झाली ज्यामध्ये श्री शिवदुर्ग संवर्धन चे श्री. वैभव पाटील व श्री. शंकर धावले यांनी विद्यार्थ्यांना गडाचा इतिहास आणि गडावर असणाऱ्या प्रत्येक वास्तूची अचूक माहिती दिली.
शिक्षण, संस्कार आणि सेवा या त्रिसूत्री मध्ये विद्यार्थी घडवत ढोले पाटील एज्युकेशन सोसायटी आपले वेगळेपण गेली अनेक वर्षे जपत आहे.छत्रपती शिवाजी महाराज यांच्याकडून आपल्याला गड-किल्ल्यांच्या स्वरूपात मिळालेला अमूल्य वारसा जतन होणे हे आपले कर्तव्य आहे ही भावना आज विद्यार्थांच्या मनात निर्माण होत आहे.