‘मोफत बेड’साठी एक लाख रुपये घेणाऱ्या ‘स्पर्श’, ‘पद्मजा’वर खंडणी, दरोड्याचा गुन्हा दाखल करा

शनिवार, 1 मे 2021 (09:23 IST)
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने ऑटो क्लस्टरमध्ये चालविण्यात येत असलेल्या कोविड सेंटरमध्ये आयसीयू बेडसाठी एका रुग्णाच्या नातेवाईकांकडून स्पर्श संस्थेने तब्बल एक लाख रुपये घेतले.  ‘एक लाख रुपये द्या आणि ऑटो क्लस्टरमध्ये बेड मिळवा’ अशी परिस्थिती आहे. महापालिका पैसे देत असतानाही ‘स्पर्श’ संस्थेचे व्यवस्थापन दादागिरी करते. खासगी हॉस्पिटलशी सेटिंग करून बेडसाठी रुग्णांकडून लाख -लाख रुपये घेते. हे प्रकरण मिटविण्यासाठी 15 ते 20 लाख देण्याची तयारी दर्शविली होती. सत्तारूढ पक्षनेते मध्यस्थी करत होते. त्यामुळे ‘स्पर्श’ संस्था आणि वाल्हेकरवाडीतील ‘पद्मजा’ हॉस्पिटलवर खंडणी, दरोड्याचा, चोरीचा, सदोष मनुष्यवधाचा  गुन्हा दाखल करावा, अशी जोरदार मागणी नगरसेवकांनी महासभेत केली.
 
‘स्पर्श’वर गुन्हा दाखल केला नाही तर आयुक्तांवरच गुन्हा दाखल करण्याचा इशारा नगरसेवकांनी दिला. संबंधित ठिकाणचे ‘सीसीटीव्ही’ फुटेज बाहेर काढा. हे प्रकार कोणते नगरसेवक चालवत आहे, धंदा करत आहे हे कळेल, असेही नगरसेवक म्हणाले.
 
पिंपरी-चिंचवड महापालिकेची विशेष सभा आयोजित केली होती. महापौर उषा ढोरे सभेच्या अध्यक्षस्थानी होत्या.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती