पुण्यातील कंपनीत लागलेल्या आगीत एकाचा मृत्यू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता; आग नियंत्रणात

गुरूवार, 16 सप्टेंबर 2021 (15:22 IST)
पुणे शहरातील नांदेड फाटा येथील भाऊ इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये  एका कंपनीमध्ये भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. अग्निशमन दलाची आठ वाहने घटनास्थळी दाखल झाली असून आगाीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न अग्निशमन दलाचे  जवान करत आहेत. दरम्यान जवानांनी एक मृतदेह बाहेर काढला आहे. मृतांची संख्या वाढण्याची भीती वर्तविण्यात आली आहे. सकाळी 11 च्या सुमारास लागली आहे.
 
कंपनीत लागलेल्या आगीमध्ये एक महिला गंभीर जखमी झाली असून त्या महिलेला अग्निशमन दलाच्या जवानांनी बाहेर काढून पोलिसांच्या स्वाधिन केले असल्याची माहिती मनपा अग्नीशमन दलाचे प्रमुख प्रशांत रणपिसे यांनी दिली आहे.पोलिसांनी या महिलेला तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु होते.
 
दरम्यान, या कंपनीमध्ये केक वरील शोभेची दारु (मेनबत्ती) तयार करण्यात येत होती, अशी माहिती मिळत आहे. कंपनीत मोठ्या प्रमाणात ज्वलनशील पदार्थ असल्याने आगीवर नियंत्रण मिळवणे अवघड जात आहे. घटनास्थळी बघ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याने हवेली पोलिस ठाण्यातील  पोलीस अधिकारी आणि कर्मचारी गर्दी दूर करण्याचा प्रयत्न करत आहेत. आताच हाती आलेल्या वृत्तानुसार आगीवर पुर्णपणे नियंत्रण मिळवण्यात आले असून कुलिंगचे काम सुरू आहे. सदरील कंपनी 5 गुंठे जागेवर आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती