त्याचबरोबर मसूद यांनी अफगाणी नागरिकांना राष्ट्रीय बंडाचंही आवाहन केलं आहे. त्यांनी म्हटलं आहे, " तुम्ही कोठेही असा, पण आपल्या देशाच्या सन्मान, स्वातंत्र्य आणि समृद्धीसाठी तुम्ही बंड करावं असं मी आवाहन करतो."
सोमवारीही तालिबानने पंजशीरवर ताबा मिळवल्याचा दावा केला होता.
तालिबानचे प्रवक्ते झबिहुल्ला मुजाहिद यांनी एक निवेदन जारी करून म्हटले आहे की, अफगाणिस्तानचा शेवटचा बालेकिल्ला जो त्यांच्या ताब्यात नव्हता आता तो ही काबीज करण्यात आला आहे.मात्र तालिबानविरोधात लढणाऱ्या नॅशनल रेझिस्टन्स फ्रंटने (एनआरएफ) हा दावा फेटाळला आहे.एनआरएफचे प्रवक्ते अली मैसम यांनी बीबीसीला सांगितले की, "हे खरं नाही, तालिबानने पंजशीरवर ताबा मिळवलेला नाही. मी हे दावे फेटाळतो."
अफगाणांना आता शांततापूर्ण सुखी जीवन, स्वातंत्र्याचा आनंद आणि बंधुत्व मिळेल, असं तालिबानने आपल्या निवेदनात म्हटलं आहे.तीन आठवड्यांपूर्वी तालिबानने अफगाणिस्तानवर नियंत्रण मिळवलं. 15 ऑगस्टला त्यांनी राजधानी काबुलवर ताबा मिळवला.