पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यवसायिक परांजपे बंधूंविरोधात गुन्हा दाखल

शुक्रवार, 25 जून 2021 (16:45 IST)
फसवणूक केल्याप्रकरणी पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यवसायिक श्रीकांत परांजपे आणि शशांक परांजपे यांच्याविरोधात मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. एका ७० वर्षीय वृद्ध महिलेने केलेल्या तक्रारीच्या आधारे मुंबई पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या प्राथमिक तपास सूरू असून दोन्ही बंधूंना चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. दोन्ही बंधूंवर बनावट कागदपत्रांच्या आधारे महिलेची फसवणूक केल्याचा आरोप आहे. मुंबई पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.
 
तसेच पोलीस उपायुक्त मंजूनाथ सिंगे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिलेल्या माहितीनुसार, ‘कलम ४०६, ४२०, ४६४, ४६७ आणि ४६८ अंतर्गत विले पार्ले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका ७० वर्षीय महिलेने श्रीकांत परांजपे, शशांक परांजपे तसेच आर पाटील नावाच्या एका व्यक्तीविरोधात व्यवसायात फसवणूक केल्याची आणि बनावट दस्तऐवज वापरल्याची तक्रार केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. महिलेने दिलेल्या तक्रारीच्या आधारे गुरुवारी रात्री उशिरा मुंबई पोलिसांनी परांजपे बंधूंना पुण्यातून मुंबईला आणले. चौकशी सुरू असून अटक केली असे म्हणू शकत नाही.’ त्याचबरोबर ‘तक्रारदार महिलेने तक्रारीत महागेव परांजपे आणि रघुवेंद पाठक यांचाही उल्लेख केला आहे. याआधी जानेवारी २०२० मध्येही त्यांच्याविरोधात अशीच एक फसवणूक आणि बनावट दस्तऐवज वापरल्याची तक्रार करण्यात आली होती. त्याप्रकरणीदेखील तपास सुरू आहे’, अशी माहितीही त्यांनी दिली.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती