पुण्यातील भिडेवाड्यात राष्ट्रीय स्मारकाचे भूमीपूजन दोन महिन्यात; उपमुख्यमंत्र्यांचे निर्देश

बुधवार, 21 डिसेंबर 2022 (21:11 IST)
नागपूर – पुणे शहरातील भिडेवाडा या राष्ट्रीय स्मारकाचे पुढील दोन महिन्यात भूमिपूजन करण्याची तयारी करण्यात याव्यात अशा सूचना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधान भवनातील बैठकीत केल्या. तर वॉर फुटिंगवर काम करून मनपा आयुक्त आणि पुणे जिल्हाधिकारी यांनी तातडीने नियोजन करून हे काम मार्गी लावावे, असे आदेश राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केल्या. त्यामुळे भिडे वाड्यातील सावित्रीबाई फुले यांच्या राष्ट्रीय स्मारकाचा प्रश्न माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या पाठपुराव्यामुळे लवकरच निकाली निघणार आहे.
 
भिडे वाड्याच्या प्रश्नावर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दालनात बैठक आयोजित करण्यात आलेली होती. या बैठकीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ओबीसी कल्याण मंत्री अतुल सावे,माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, तसेच अप्पर मुख्य सचिव भूषण गगराणी, अप्पर मुख्य सचिव नगरविकास, अप्पर मुख्य सचिव वित्त, प्रधान सचिव पर्यटन, प्रधान सचिव संस्कृतिक कार्य, मंत्रालयातील वरीष्ठ अधिकारी उपस्थितीत होते. पुण्याचे जिल्हाधिकारी आणि पुणे मनपा आयुक्त आणि गाळेधारक व्हिडिओ कॉन्फर्सिंग द्वारे उपस्थित होते.
 
या बैठकीत छगन भुजबळ यांनी राष्ट्रीय स्मारकाबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले की, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले म्हणजे स्त्री शिक्षणाची गंगोत्री अन् भारतातील पहिल्या महिला शिक्षिका. फुले दाम्पत्यांनी पुण्यातील भिडे वाड्यात मुलींसाठीची पहिली शाळा सुरु करून शिक्षणाची कवाडं उघडली. मात्र,काळ सरला आणि हीच प्रेरणादायी शाळा अक्षरशः भग्नावस्थेत गेली. जागेचं प्रकरण न्यायालयात गेलं आणि खटला वर्षानुवर्षे सुरु राहिला आता मात्र हा वाद आपल्याला मिटवला पाहिजे अशी मागणी त्यांनी केली.
 
ते म्हणाले की, महात्मा फुले व सावित्रीबाई फुले या दांपत्याने मुलींची पहिली शाळा दि. १ जाने १८४८ रोजी पुण्यात बुधवार पेठेत भिडे यांच्या वाड्यात सुरु केली आणि स्त्री शिक्षणाचे बीज हिंदुस्थानात रोवले असणे, शुद्रातिशूद्र समाजासाठी ज्ञानाची कवाडे खुली करून शिक्षण क्षेत्रात त्यांनी क्रांती घडवून त्यानंतर मोठा संघर्ष करून अनेक महिला शाळा त्यांनी सुरू केल्या त्याच सावित्रीबाई फुले यांनी सुरू केलेल्या शाळेची आज दुरवस्था पहावत नाही असेही ते म्हणाले.
 
ते म्हणाले की,“पुणे येथील भिडेवाडा हे राष्ट्रीय स्मारक करण्यासाठी काल दिवसभर जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री. बाबा आढाव यांच्यासह समता परिषदेचे अनेक कार्यकर्ते भिडेवाड्याच्या समोर उपोषणाला बसलेले होते. ही ऐतिहासिक वास्तू पुणे महानगरपालिकेने विहित पद्धतीने ताब्यात घेवून त्या ठिकाणी राष्ट्रीय स्मारक करण्यासाठी मनपाने दि. २१ फेब्रुवारी २००६ रोजी ठराव क्र. ५५७ अन्वये ठराव मंजूर केलेला आहे. भिडेवाडयात पुणे महानगरपालिकेच्या वतीने “सावित्रीबाई फुले आद्य मुलींची शाळा” सुरु करण्याचा दि. २७ नोव्हेंबर २०२१ रोजी शासनाने निर्णय घेतलेला आहे. महानगरपालिकेने ही ऐतिहासिक वास्तू ताब्यात घेऊन या ठिकाणी “सावित्रीबाई फुले आद्य मुलींची शाळा” सुरु करून राष्ट्रीय दर्जाचे स्मारक करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.
 
ते म्हणाले की, शासनाने या जागेवर उपलब्ध चटईक्षेत्र निर्देशांक विशेष बाब म्हणून नियम शिथिल करून वाढीव अथवा मेट्रोमर्गिका करीताचा चटईक्षेत्र निर्देशांक (FSI) अधिकचा मंजूर करून आताच्या सर्व भाडेकरूंचे पुनर्वसन नवीन इमारतीमध्ये तळ मजल्यांवर किंवा एक मजल्यावर करता येईल. अतिरिक्त चटई क्षेत्र वापरून उपलब्ध होणाऱ्या उर्वरित मजल्यांच्या बांधकामात “सावित्रीबाई फुले आद्य मुलींची शाळा” तसेच या दांपत्याचे आयुष्य व त्यांचे कार्य याविषयी माहितीपट कायमस्वरूपी प्रदर्शन, जीवनपट चित्रफीत आणि अभ्यासिका,सुसज्ज सभागृह असे सर्व प्रकल्प महानगरपालिकेने (जागा संपादनासाठी होणाऱ्या अनावश्यक खर्चाच्या बचतीतून व शासनाचे अतिरिक्त अनुदान) यातून करावे. यामुळे भाडेकरूंचे नुकसान न होता किमान खर्चात चांगले स्मारक होऊ शकेल अशी भूमिका त्यांनी मांडली. यावेळी छगन भुजबळ यांची शिष्टाई काम आली असून गाळेधारक व्यासायीकानी क्रांतीज्योती सावित्रीबाई यांच्या स्मारकासाठी त्यांनी उच्च न्यायालयातील याचिका मागे घेण्याची तयारी दर्शविली आहे. त्यामुळे या जागेची कायदेशीर अडचण दूर होणार आहे.
 
त्यानंतर यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन महिन्यांच्या आत भूमिपूजन करण्याची तयारी करण्यात यावी यासाठी आवश्यक ती सर्व तयारी अधिकाऱ्यांनी करावी अशा सूचना दिल्या. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वार फुटिंगवर काम करून गाळेधारकांसोबत तातडीने बैठक घेऊन मनपा आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांनी तातडीने अहवाल सादर करावा असे आदेश दिले.
Edited by : Ratnadeep Ranshoor

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती