पुणे : जिल्ह्यातील दौंडमध्ये पिसाळलेल्या कुत्र्याने तब्बल 20 ते 22 जणांना चावा घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या कुत्र्यांमुळे नागरिक गंभीर जखमी झाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून हा पिसाळलेला कुत्रा दौंड परिसरामध्ये फिरत होता. त्यावेळी रस्त्यावरुन ये-जा करणाऱ्या 20 ते 22 जणांना त्याने चावा घेतला आहे. या कुत्र्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दौंड मधील एसआरपी कॅम्पमध्ये म्हसोबाची यात्रा सुरु होती. त्यावेळी यात्रेत पिसाळलेला कुत्रा शिरल्याने त्याने अनेकांना चावा घेतला आहे. त्यामुळे 20 ते 22 जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये अल्पवयीन मुलीचा देखील समावेश आहे. त्यामुळे दौंड नगरपालिकेकडून पिसाळलेल्या कुत्र्याचा शोध सुरु आहे. कुत्रा चावल्याने जखमींना उपजिल्हा रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान, दौंडच्या रुग्णलयामध्ये म्हसोबा यात्रेमधून पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतलेले रुग्ण आले होते. कुत्र्याने चावा घेतल्याने अनेक लोकांना मोठ्या प्रमाणात दुखापत झाली होती आणि रक्तस्त्राव देखील झाला होता. त्यामुळे जखमींवर आवशक उपचार करून इंजेक्शनदेखील दिले आहे. त्यासोबतच टीटीचे इंजेक्शनही देण्यात आले आहे.
प्राथमिक उपचार करुन त्या सगळ्या रुग्णांवर आता उपजिल्हा रुग्णालयामध्ये पुढील उपचारासाठी पाठवण्यात आले आहे. चावा घेतलेल्या कुत्र्यावर किमान 10 दिवस नजर ठेवणे गरजेचे असून त्याचे योग्य पालन पोषण करणे गरजेचे आहे. 10 दिवसामध्ये कुत्र्याचा मृत्यू झाला तर कुत्र्याला रेबिज असल्याचे सिद्ध होते, त्यामुळे कुत्र्याची काळजी घेणे महत्वाचे असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.