जेलमध्ये असताना दरोड्याचं प्लॅनिंग केलं, फिल्मी स्टाईलने 27 लाख रुपये लुटले
मंगळवार, 15 नोव्हेंबर 2022 (23:21 IST)
पुण्यात शनिवारी 12 नोव्हेंबरला मध्य वस्तीतल्या मार्केट यार्ड भागात भरदुपारी बंदुकीची गोळी झाडून दरोडा घालण्यात आला होता.मार्केटयार्ड जवळच्या गणराज मार्केट मधल्या पी.एम. कुरीअर या ऑफिसच्या ड्रावरमधून रोख 27 लाख 45 हजार आणि दोन मोबाईल दरोडेखोरांनी चोरुन नेले.
यासाठी या दुकानात 5 इसमांनी प्रवेश केला होता. कोयता आणि बंदुकीचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी देऊन त्यांनी हे पैसे लुटून नेले होते. दिवसाढवळ्या झालेल्या या घटनेने नागरिक तसंच व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली होती.
बंदुकीची गोळी जमिनीवर झाडण्यात आली होती. पण पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने या चोरट्यांचा छडा लावला आणि या प्रकरणात एकूण 7 जणांना अटक केली आहे.
पोलिसांच्या तपासात या दरोड्याचं प्लॅनिंग कसं झालं याची माहीती समोर आली आहे.
आंगडिया व्यावसायीकाच्या या दुकानाची लूट करण्याचं प्लॅनिंग जेलमध्ये झालं होतं, अशी माहीती पोलिंसांनी दिली आहे.
या प्रकरणात पोलिसांनी मावळ भागातल्या मोर्वेगाव इथल्या एका फार्म हाऊसमधून आरोपींना सापळा रचून ताब्यात घेतलं.
यातील बहुतेक जण गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले आहेत. याआधी जेलमध्ये असताना जानेवारी महिन्यातच त्यांनी या दरोड्याचं प्लॅनिंग केलं होतं, असं पोलिसांकडून सांगण्यात आलं.
या आरोपींकडून पोलिसांनी 11 लाख 18 हजार इतकी रोख रक्कम, गुन्हा करताना वापरलेले सात मोबाईल, एक लोखंडी कोयता, गुन्ह्यांत वापरलेली तीन दुचाकी वाहनं असा एकूण 13 लाख 43 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
अविनाश उर्फ रामप्रताप गुप्ता (वय 20), आदित्य अशोक मारणे (वय 28), दीपक ओमप्रकाश शर्मा (वय 19) , विशाल सतीश कसबे (वय 20), अजय बापू दिवटे (वय 23) गुरुजनसिंह सेवासिंह विरक (वय 22) निलेश बाळू गोठे (वय 20) यांना अटक करण्यात आली आहे.
ज्या पिस्तूलमधून फायरिंग झालं ते पिस्तूल अजून सापडायचं आहे आणि इतर 4 साथीदारांचा शोध सुरु आहे, असं पोलिसांनी सांगितलं.
यातल्या आरोपींची जेलमध्ये ओळख झाली होती. कुरिअर ऑफिसमध्ये मोठी कॅश असते. त्यामुळे त्यांनी हे दुकान लुटण्याचा प्लॅन तिथे बनवला.
यामध्ये आंगडिया व्यावसायीक पोलिसांमध्ये कदाचित तक्रार करणार नाही, असा त्यांचा अंदाज होता. त्यामुळे त्यांनी जवळपास 27 लाखांची रोकड लुटून नेली.
या आरोपींचा तुरुंगातच कट शिजला आणि तुरुंगाबाहेर आल्यावर त्यांनी तो कट अंमलात आणला अशी माहीती गुन्हे शाखेचे उपआयुक्त श्रीनिवास घाडगे यांनी दिली.
“आरोपींनी असा विचार केला होता की आंगडिया यांचा हा रोख रकमेचा व्यवहार असतो. रोकडचा व्यवहार असल्याने ते तक्रार द्यायला जाणार नाहीत असा त्यांचा समज होता,” असं श्रीनिवास घाडगे यांनी सांगतिलं.