लग्नाचे बनावट प्रमाणपत्र देऊन तरुणीला घातला 11 लाखांना गंडा, जाणून घ्या प्रकरण

सोमवार, 13 सप्टेंबर 2021 (15:39 IST)
विवाह संस्थेच्या वेबसाईटवरुन ओळख होऊन विश्वास संपादन करुन एकाने लग्नाचे बनावट प्रमाणपत्र तयार करुन तरुणीला तब्बल ११ लाख रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे.याप्रकरणी निगडी पोलिसांनी प्रेमराज थेवराज (रा.चेन्नई, तामिळनाडु) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार २७ एप्रिल २०२० ते ११ सप्टेंबर २०२१ दरम्यान चिंचवडमधील संभाजीनगर  येथील फिर्यादी तरुणीच्या घरात घडला आहे.
 
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी यांची जीवनसाथी डॉट कॉम या लग्नाच्या संकेतस्थळावर ओळख झाली.आरोपीने फिर्यादीसोबत लग्न करतो, असे सांगून २ ते ३ महिने फोनवर बोलून फिर्यादीचा विश्वास संपादन केला.आपल्याला पैशांची गरज असल्याचे खोटे सांगून फिर्यादीकडून एकूण ११ लाख ४ हजार ५०० रुपये घेतले.फिर्यादीला लग्न करण्यासाठी चेन्नईला बोलावून घेतले.तेथे लग्नाचे फॉर्मवर सह्या घेतल्या. तसेच त्यानंतर त्याने फिर्यादीस लग्नाचे खोटे प्रमाणपत्र पाठविले.
 
मला व्यवसायासाठी ८० लाख रुपये कर्ज तुझ्या नावावर काढून दे, असे सांगितले.तेव्हा फिर्यादीने त्याला कर्ज काढून देण्यास नकार दिला. त्यावर त्याने फिर्यादीचे आई वडिलांना बरेवाईट करण्याची धमकी दिली.फिर्यादीचा विश्वासघात करुन लग्नाचे आमिष दाखवून लग्नाचे खोटे प्रमाणपत्र पाठवून एकूण ११ लाख ४  हजार ५०० रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती