Skandamata Devi मोक्षाचा मार्ग सुलभ करणारी देवी स्कंदमाता

रविवार, 10 ऑक्टोबर 2021 (11:03 IST)
दुर्गेचे पाचवे रूप 'स्कंदमाता' या नावाने ओळखले जाते. नवरात्रीच्या पाचव्या दिवशी देवीची पूजा केली जाते. या दिवशी साधकाचे मन 'विशुद्ध' चक्रात स्थिर झालेले असते. भगवान स्कंद लहानपणी या देवीच्या काखेत बसले होते.
 
भगवान स्कंद 'कुमार कार्तिकेय' नावानेही ओळखले जातात. ते देवासूर संग्रामात देवतांचे सेनापती बनले होते. पुराणात त्यांना कुमार आणि शक्ती म्हणून त्यांचा महिमा वर्णन केलेला आहे. भगवान स्कंदची आई असल्यामुळे दुर्गाच्या या रूपाला स्कंदमाता म्हणून ओळखले जाते. स्कंदमाता चारभुजाधारी आहे. तिच्या उजव्या बाजूकडील खालील भुजा, जी वर उचललेली आहे, त्या हातात कमळाचे फूल आहे.
 
डावीकडील वरच्या हातात वरमुद्रा तसेच खालील भुजा वरच्या बाजुला उचललेली आहे त्यामध्ये कमळाचे फूल घेतलेले आहे. या देवीचा रंग पूर्णत: शुभ्र आहे. ही देवी कमळाच्या आसनावर विराजमान असते. यामुळे या देवीला पद्मासना असेही म्हटले जाते. तिचे वाहन सिंह आहे.
 
नवरात्रीतील पाचव्या दिवसाचे शास्त्रात विशेष महत्त्व सांगितले आहे. यावेळी चक्रात स्थिर झालेल्या साधकांची चित्तवृत्ती लोप पावते. सर्व बंधनातून साधकाचे मन मुक्त होऊन पदमासना स्कंदमातेच्या रूपात तल्ल‍ीन होते. यादरम्यान साधकाला पूर्ण सावधगिरीने उपासना करणे आवश्यक आहे. सर्वतोपरी एकाग्र होऊन साधनेच्या मार्गावर जायला पाहिजे.
 
स्कंदमातेच्या उपासनेने भक्ताची इच्छा पूर्ण होते. मृत्यूलोकातच त्याला परम शांती आणि सुखाचा अनुभव मिळतो. त्याच्यासाठी मोक्षाचा मार्ग सोपा होतो. स्कंदमातेच्या उपासनेने भगवान स्कंदाची उपासनाही सफल होते. सूर्यमंडळाची अधिष्ठात्री देवी असल्यामुळे तिच्या भक्ताला अलौकीक तेज प्राप्त होते. आपण एकाग्र मनाने पवित्र होवून मातेला शरण येण्याचा प्रयत्न केला पाहिजे. या भवसागरात दु:खापासून मुक्ती मिळवून मोक्षाचा मार्ग सुलभ करण्यासाठी यापेक्षा चांगला पर्याय दुसरा नाही.
 
स्कंदमाता बाल कार्तिकेयासह सिंहावर आरूढ असे तिचे रूप आहे. हे शौर्य आणि करुणेचे द्योतक आहे. सिंह शौर्याचे द्योतक आहे तर देवी साक्षात करुणेची मूर्ती आहे. स्कंद म्हणजे तज्ञ, निष्णात. देवीच्या या रुपाची आराधना केल्याने कौशल्यासह निरागसपणा आणि शौर्यासह करुणा हे गुण वाढीस लागतात.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती