वसुबारस निमित्त घरी झटपट बनणार बाजरीची भाकरी आणि गवारीची भाजी

शुक्रवार, 10 ऑक्टोबर 2025 (11:54 IST)
वसुबारस हा सण धनत्रयोदशीच्या एक दिवस आधी, म्हणजेच अश्विन महिन्याच्या द्वादशीला साजरा केला जातो आणि दिवाळी उत्सवाची सुरुवात म्हणून याला विशेष महत्त्व आहे. या दिवशी गाईची व तिच्या वासराची पूजा केली जाते, ज्यामुळे घरात लक्ष्मी देवीचे आगमन होते. 
 
हा सण दिवाळीच्या सुरुवातीचा दिवस आहे, जो गाई-वासरांची पूजा करून आणि घरातील समृद्धीसाठी केला जातो. या दिवशी तुळशीपुढे पणत्या लावून रोषणाई केली जाते आणि रांगोळी काढली जाते. गायीला मातेचा दर्जा दिला जातो कारण ती समाजाला पौष्टिक दूध आणि शेतीसाठी खत देऊन समृद्ध करते. या पूजनामुळे गाईच्या सात्त्विक गुणांचा स्वीकार करण्याची शिकवण मिळते.  
 
वसुबारस आणि भाकरी-भाजीचे महत्त्व
या दिवशी गाईला गुळ आणि बाजरीच्या भाकरीचा नैवेद्य दाखवला जातो, असे अनेक पारंपरिक पद्धतींमधून सांगितले जाते.  स्त्रिया बाजरीची भाकरी व गवारीची भाजी खाऊन उपवास सोडतात, जे आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर आहे. या दिवशी गाईच्या दूधापासून बनवलेले पदार्थ (दूध, तूप, ताक) आणि उडदाचे वडे खाल्ले जात नाहीत. 
 
मऊ लुसलुशीत बाजरीची भाकरी कशी करावी
ताजं दळलेलं दोन वाटी बाजरीचं पीठ घ्यावं. पिठात हळूहळू कोमट पाणी घालून मळून घ्यावं. अशाने भाकर तुटत नाही. मग मध्यम आकाराचे गोळे तयार करुन भाकरी कोरडं पीठ लावून थापून घ्या. थापणे जमत नसेल तर लाटून घ्या. मात्र गरजेपेक्षा जास्त पीठ लावू नका नाहीतर भाकर कडक होते. तवा गरम करुन दोन्ही बाजूने भाकर भाजून घ्या. नंतर गॅसवर शेकून घ्या.
 
चमचमीत गवारीची भाजी
एका पातेल्यात पाणी गरम करून त्यात २५० ग्रॅम गवारी थोडीशी शिजवून घ्या (अर्धवट शिजेपर्यंत). नंतर पाणी गाळून बाजूला ठेवा.
 कढईत तेल गरम करून मोहरी, जिरे, हिंग आणि हळद टाका.
लाल तिखट आणि गोडा मसाला टाका व एकत्र मिसळा. 
शिजवलेली गवारी घालून चांगलं हलवा. 
झाकण ठेवून ५-७ मिनिटे मंद आचेवर शिजू द्या, जेणेकरून मसाला नीट लागेल. 
शेवटी मीठ आणि ओलं नारळ आणि दाण्याचं कूट घालून वरुन बारीक चिरलेली कोथिंबीर घाला.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती