बृहन्मुंबई महानगरपालिकेने मंजूर केलेल्या एका ठरावानुसार बुधवारी सार्वजनिक सुट्टी आल्यास त्या बुधवारी हे उद्यान व प्राणी संग्रहालय जनतेसाठी खुले ठेवण्यात येईल. त्यानुसार येत्या बुधवारी म्हणजेच दि. 22 मार्च 2023 रोजी गुढीपाडव्यानिमित्त सार्वजनिक सुट्टी आहे. मात्र, या सुट्टीच्या दिवशी उद्यान व प्राणिसंग्रहालय जनतेच्या सुविधेकरिता खुले ठेवण्यात येणार आहे. तर या आठवड्यातील साप्ताहिक सुट्टी ही येत्या गुरुवारी म्हणजेच दिनांक 23 मार्च 2023 रोजी असणार आहे. जेणेकरुन पाडव्याच्या सुट्टीच्या दिवशी लहान-थोरांना उद्यान व प्राणिसंग्रहालयातील प्राणी, वनस्पती, पक्षी यांना बघता येईल व एकूणच तेथील पर्यावरणाचा आनंद घेता येईल.
दरम्यान, बुधवारी राणीची बाग जनतेकरिता खुले ठेवण्यात येणार असल्याने त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे गुरुवारी हे प्राणिसंग्रहालय बंद ठेवण्यात येणार आहे. यानुसार राणीची बाग प्राणिसंग्रहालय गुरुवार, दिनांक 23 मार्च, 2023 रोजी जनतेकरिता बंद राहणार असल्याचे पालिका प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे. हे उद्यान साप्ताहिक सुट्टीचा दिवस वगळता आठवड्यातील इतर सर्व दिवशी नागरिकांसाठी खुले असते. इतर दिवशी सकाळी 9.30 ते सायंकाळी 5.00 या दरम्यान उद्यानाची तिकीट खिडकी सुरु असते. तर उद्यान सायंकाळी 6.00 वाजता बंद होते.