मुंबईतील स्वच्छतागृहांमध्ये महिलांसाठी पाच हजार सॅनिटरी नॅपकीन मशिन्स बसविणार – मंत्री शंभूराज देसाई

गुरूवार, 16 मार्च 2023 (08:32 IST)
मुंबई शहरात असलेल्या ८ हजार १७३ स्वच्छतागृहांपैकी बृहन्मुंबई महानगरपालिकेने निश्चित केलेल्या पाच हजार स्वच्छतागृहांवर आयओटी (इंटरनेट ऑफ थिंग्ज) आणि डेटा एनालिटीक्स आधारित कॉम्बो सॅनिटरी नॅपकीन वेंडींग आणि इन्सिनेरेटर मशीन बसविण्यात येणार असल्याचे मंत्री शंभूराज देसाई यांनी विधान परिषदेत सांगितले. संबंधित पुरवठादारांशी संबंधित सर्व बाबी निविदा समितीने तपासल्या असून या कामी अनियमितता झाली नसल्याचे ते म्हणाले.
 
सदस्य ॲड. अनिल परब यांनी या मशीन बसविण्यासाठी काढलेल्या निविदेमध्ये गैरव्यवहार झाल्याबाबत लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती.
 
मंत्री श्री.देसाई म्हणाले, शहरातील सर्व महिलांची आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. यादृष्टीने स्वच्छतागृहांमध्ये सॅनिटरी नॅपकीन बसविण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर २७ जानेवारी २०२३ पर्यंत प्राप्त होतील, अशा रितीने निविदा सूचना प्रसिद्ध करण्यात आली होती. यास केवळ दोन निविदाधारकांचा प्रतिसाद मिळाल्याने त्यास ३१ जानेवारी पर्यंत मुदतवाढ देण्यात आली. त्यानंतर प्राप्त निविदांमधून लघुत्तम निविदाकाराचा ७६,५२८ हा रास्त व वाजवी दर असल्याचे बृहन्मुंबई महानगरपालिकेने कळविले असल्याचे श्री.देसाई यांनी सांगितले. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या स्वच्छतागृहांच्या व्यतिरिक्त इतर स्वच्छतागृहांमध्ये सुद्धा अशा मशिन्स बसविण्याबाबत विचार करण्यात येईल, असेही त्यांनी एका उप प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.
 
बृहन्मुंबईतील स्वच्छतागृहांच्या संख्येबाबत विसंगती दिसून येत असल्याने महानगरपालिकेच्या संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत २० तारखेला बैठक घेण्याचे निर्देश उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी दिले. त्यावर अशी बैठक घेण्यात येईल, असे मंत्री श्री.देसाई यांनी सांगितले.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती