Mumbai News : मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर सिग्नल बिघाडामुळे मंगळवारी सकाळी लोकल ट्रेन सेवा विस्कळीत झाली. ठाणे जिल्ह्यातील दिवा आणि मुंब्रा रेल्वे स्थानकांदरम्यान दक्षिणेकडे जाणाऱ्या धीम्या ट्रॅकवर पहाटे 4.55 वाजता सिग्नल बिघाड झाला, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. यामुळे लोकल गाड्या 15-20 मिनिटे उशिराने धावल्या.
मिळालेल्या माहितीनुसार मध्य रेल्वे (CR) चे मुख्य जनसंपर्क अधिकारी स्वप्नील नीला म्हणाले की, सिग्नल बिघाड झाल्यानंतर एक तासाहून अधिक काळानंतर सकाळी 6 वाजताच्या सुमारास पूर्ववत करण्यात आला. यामुळे मध्य रेल्वेच्या उपनगरीय गाड्या आणि मुख्य मार्गावरील स्थानकांमध्ये गर्दी वाढली. त्यामुळे प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागला.
मुंबईत नवीन डिझाइनच्या गाड्या येतील-वैष्णव
केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की, मुंबई उपनगरीय रेल्वेला लवकरच नवीन डिझाइन केलेल्या गाड्या मिळतील. प्रवाशांच्या सोयीसाठी आणि गर्दी कमी करण्यासाठी यामध्ये चांगल्या सुविधा असतील. वैष्णव म्हणाले की, मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेमध्ये मुंबईसाठी 16 हजार कोटी रुपयांचे प्रकल्प पूर्ण होणार आहे. सध्या दोन लोकल गाड्यांमधील वेळेचे अंतर 180 सेकंद आहे, ते कमी करून 150 आणि 120 सेकंद केले जाईल.