पाकिस्तानसोबत वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्र सरकार सतर्क आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी दक्षिण मुंबईतील त्यांच्या 'वर्षा' या सरकारी निवासस्थानी सध्याच्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा उपाययोजनांबाबत उच्चस्तरीय बैठक घेतली.
मिळालेल्या माहितनुसार या बैठकीला राज्याचे पोलिस महासंचालक, मुंबई पोलिस आयुक्त, गृह विभागाचे उच्च अधिकारी आणि विविध संस्था आणि विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेही उपस्थित होते. सध्याची परिस्थिती पाहता, महाराष्ट्र सरकारने आरोग्य, आपत्ती व्यवस्थापन आणि इतर अनेक विभागांच्या उच्च अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द केल्या आहे.
तसेच राज्यातील ३६ जिल्ह्यांमध्ये तयारीसाठी मॉक ड्रिल आयोजित करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. ते म्हणाले की, प्रत्येक जिल्ह्यात एक 'युद्ध कक्ष' स्थापन केला पाहिजे. तसेच, वीजपुरवठा खंडित होत असताना रुग्णालयांशी समन्वय यंत्रणा स्थापित केली पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला ब्लॅकआउट दरम्यान काय करावे याबद्दल जागरूकता पसरवण्यास सांगितले. सायबर गुन्हे विभागाला प्रत्येक जिल्ह्यातील सोशल मीडिया हँडलवर लक्ष ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहे. तत्पूर्वी, मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्रात पोलिस, तटरक्षक दल आणि नौदल सतर्क आहे. महाराष्ट्र देखील पूर्णपणे सतर्क आहे, येथील लोकांना सुरक्षित ठेवणे ही आमची जबाबदारी आहे." असे देखील मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.