मुंबई : मुंबईतील प्रसिद्ध हाजी अली दर्ग्याच्या ट्रस्टला गुरुवारी सायंकाळी अज्ञात व्यक्तीने फोन केला. व त्या व्यक्तीने मशिदीच्या आवारात बॉम्ब ठेवल्याची धमकी दिली. याशिवाय त्यांनी दर्ग्याबाबत वादग्रस्त विधानेही केली होती. तसेच यानंतर ट्रस्टने या प्रकरणाची तक्रार जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये केली. पोलिसांनी बॉम्बशोधक पथकासह घटनास्थळी पोहोचून तपास केला.
मिळालेल्या माहितीनुसार मुंबईतील हाजी अली दर्ग्याला गुरुवारी बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली होती. त्या व्यक्तीने दर्गा ट्रस्टच्या कार्यालयात फोन करून आवारात बॉम्ब ठेवण्याची धमकी दिली होती. पोलिसांनी सांगितले की, संध्याकाळी 5 वाजता हा कॉल आला होता.
या प्रकरणाची माहिती मिळताच पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि बॉम्बशोधक पथकाने दर्ग्यात पोहोचून तपासणी केली, पण काहीही संशयास्पद आढळून आले नाही. तारदेव पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.