अल्कलाईन डाएट म्हणजे काय? तो घेतल्यावर काय फायदा होतो?
रविवार, 30 जुलै 2023 (11:39 IST)
अल्कलाईन डाएट म्हणजेच अल्कधर्मी आहार.. जेव्हा केव्हा आपण आरोग्य आणि पोषणाबद्दलच्या चर्चा करतो तेव्हा हा शब्द हमखास ऐकण्यात येतो.
पण हा आहार वादात सुद्धा आहे बरं का. त्यामुळे तो आहार घेणं सुरक्षित आहे का? वैज्ञानिकदृष्ट्या तो शरीरासाठी चांगला आहे का?
अशा अनेक प्रश्नांची उत्तरे या लेखातून पाहूया..
अल्कधर्मी आहार हा एक डाएट प्लॅन आहे. आपण जे अन्न खातो त्याद्वारे शरीर आणि रक्ताचा पीएच बदलू शकतो या सिद्धांतावर आधारलेला हा डाएट प्लॅन आहे.
आंबटपणा आणि क्षारता यांचं प्रमाण दर्शविण्यासाठी जे मानक वापरलं जातं त्याला पीएच म्हणतात.
पण हा आहार घेतल्यावर तुमच्या शरीराची आणि रक्ताची पीएच पातळी बदलू शकते याचा कोणताही भक्कम वैज्ञानिक पुरावा नाही.
अल्कधर्मी आहार समर्थक काय म्हणतात?
अल्कधर्मी आहार आरोग्यासाठी चांगला आहे असं म्हणणारे लोक यामागे अनेक कारणं देतात. जसं की, लोक आधुनिक अन्न खातात, त्यामुळे त्यांच्या शरीरात ऍसिड जमा होते. आधुनिक अन्नामुळे संधिवात, मूत्रपिंडाचे आजार, यकृताशी संबंधित समस्या आणि कर्करोग इत्यादी आजार होण्याची शक्यता असते.
मांस, गहू, काही प्रकारची तृणधान्य, शुद्ध साखर, दुग्धजन्य पदार्थ, कॅफीन, अल्कोहोल आणि प्रक्रिया केलेले पदार्थ हे सर्व आम्ल-उत्पादक पदार्थ आहेत असं म्हटलं जातं.
अल्कधर्मी पदार्थांमध्ये फळं आणि भाज्यांचा समावेश होतो.
अल्कधर्मी आहार मुतखडा आणि मूत्रमार्गातील संसर्ग कमी करण्यास मदत करतो. आपण जे अन्न खातो त्यावर लघवीचा पीएच अवलंबून असतो. तो सतत बदलत असल्याने मूत्रमार्गाचा संसर्ग टाळण्यासाठी अल्कधर्मी आहार सुचवला जातो.
पण नुसत्या अल्कधर्मी आहारामुळे शरीराच्या पीएचमध्ये बदल होत असल्याचा कोणताही पुरावा उपलब्ध नाही.
तुमच्या शरीरातील रक्ताची पीएच पातळी ही किडनीच्या कार्यावर अवलंबून असते. थोडक्यात, रक्ताचा पीएच पूर्णपणे किडनीच्या नियंत्रणाखाली असतो. त्यामुळे अल्कधर्मी आहार घेतल्यावर रक्तातील पीएच बदलतो याचा कोणताही पुरावा नाही.
युकेच्या कॅन्सर रिसर्चच्या मते, कोणत्याही अन्नामुळे मानवी शरीराचा पीएच बदलतो याचा कोणताही सबळ पुरावा उपलब्ध नाही.
ते सांगतात की, आम्लयुक्त आहारामुळे कर्करोगाचा धोका वाढतो याचा कोणताही पुरावा नाही.
अल्कधर्मी आहाराच्या नावाखाली संतुलित आहार न घेणं धोक्याच ठरू शकतं असा इशारा आरोग्य तज्ज्ञ देतात.
पण अल्कधर्मी आहारात अधिक फळं आणि भाज्या खाणं, आहारातील साखर कमी करणं, अल्कोहोल कमी करणं या सर्व निरोगी खाण्याच्या सवयी आहेत.
अल्कधर्मी आहाराचा परिणाम होतो का?
आधुनिक आहारामध्ये सॅच्युरेटेड फॅट्स, साखर, मीठ यांचं प्रमाण जास्त असतं. तेच मॅग्नेशियम आणि पोटॅशियम सारख्या अल्कधर्मी खनिजांचं प्रमाण कमी असतं.
त्यामुळे अल्कधर्मी आहारामुळे रक्ताचा पीएच संतुलित राहू शकतो किंवा वजन वाढण्याचा धोका कमी होते हे दावे विवादास्पद आहेत.
मानवी रक्ताची पीएच पातळी 7.35 ते 7.45 दरम्यान असते. मानवी शरीराची रचना आणि प्रणाली रक्ताच्या पीएचची पातळी टिकवून ठेवते.
पण अल्कधर्मी आहारातील पदार्थ वजन संतुलित राखण्यासाठी खरोखरच उपयुक्त आहेत.
मांस, प्रक्रिया केलेले अन्न, साखर, कॅफीन, अल्कोहोल कमी करून
वनस्पती-आधारित पदार्थ जसं की फळं, भाज्या, सुकामेवा, पाणी इत्यादी पदार्थ शरीराचं वजन संतुलित राखण्यासाठी आणि आरोग्यासाठी मदत करतात.
अल्कधर्मी आहाराचे आरोग्यसाठी कोणकोणते फायदे आहेत?
अशा आहाराचे काही फायदे आहेत. जसं की वनस्पती-आधारित अन्नाचं सेवन केल्याने शरीराला पुरेसं पोटॅशियम आणि सोडियम मिळेल.
यामुळे रक्तदाब तर नियंत्रणात राहिलच पण हृदयाचे आरोग्यही सुधारेल.
हा आहार घेणारे लोक म्हणतात की, यामुळे हाडांचे आरोग्य सुधारते आणि ऑस्टियोपोरोसिसपासून संरक्षण होते.
आता याचे देखील भक्कम पुरावे नसले तरी हा आहार हाडांसाठी चांगला आहे. कारण यातून शरीराला मोठ्या प्रमाणावर पोटॅशियम मिळते.
अल्कधर्मी आहारामुळे हाडांचे आरोग्य सुधारते असा कोणताही वैज्ञानिक पुरावा नाहीये. पण या आहारामुळे वृद्धांमध्ये हाडांच्या कमकुवतपणाचा धोका वाढू शकतो, कारण यातून पुरेशी प्रथिन मिळत नाहीत.
याचे दीर्घकालीन परिणाम काय आहेत?
अल्कधर्मी आहाराचे दीर्घकालीन परिणाम तुम्ही तो आहार किती घेता यावर अवलंबून आहेत.
अल्कधर्मी आहारामध्ये सर्व प्रकारची अन्नधान्य, दुग्धजन्य पदार्थ आणि प्राणी-आधारित अन्नाचा समावेश नाही. त्यामुळे शरीराला विशिष्ट जीवनसत्त्वे आणि प्रथिने पुरेशा प्रमाणात मिळत नाहीत.
विशेषतः या आहारातून व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन बी 12, कॅल्शियम आणि लोह मिळत नाही.
अल्कधर्मी आहारामध्ये ज्याची कमतरता तो आहार त्यात समाविष्ट केल्यास शरीराला संतुलित पोषण मिळेल.
अल्कधर्मी आहार कोण घेऊ शकतो ?
गरोदर स्त्रिया, स्तनदा माता, मधुमेही आणि इतर काही आजारांनी ग्रस्त असलेल्या रुग्णांना जर नियमित आहाराव्यतिरिक्त नियंत्रित आहार घ्यायचा असेल तर त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
हा आहार तरुण आणि मुलांसाठी चांगला नाही. विशिष्ट अन्न घटक काढून टाकल्याने शरीराच्या वाढीसाठी आवश्यक पोषक तत्व मिळत नाहीत.
दुग्धजन्य पदार्थ पूर्णपणे टाळल्याने शरीराला कॅल्शियमसह इतर पोषक घटक मिळत नाहीत.
म्हणून जे अल्कधर्मी आहार घेतात त्यांनी पुरेस अन्न खाल्लं पाहिजे जेणेकरुन त्यांच्यात जे काही पोषक घटक कमी असतील ते वाढतील.
जुनाट आजार आणि गंभीर आजारांनी त्रस्त रुग्णांनी संतुलित आहार घ्यावा. अल्कधर्मी आहार तुमच्यासाठी योग्य आहे का ते डॉक्टरांकडून जाणून घ्या आणि मगच त्याचा अवलंब करा.