कॉफी बंद केल्यानंतर तुमच्या शरीरावर काय परिणाम होतात?
रविवार, 4 फेब्रुवारी 2024 (12:56 IST)
कॅफिन हा जगातील सर्वाधिक प्रमाणात सेवन केला जाणार सायकोअॅक्टिव्ह पदार्थ आहे..
तुम्ही कॉफी किंवा चहा पित नसला तरीही तुम्ही कॅफिनचे विविध मार्गांनी सेवन नियमितपणे करत असता.
सोडा ते कोल्ड्रिंक, औषधं ते चॉकलेटपर्यंत आपण खात-पित असलेल्या बहुतेक गोष्टींमध्ये मोठ्या प्रमाणात कॅफिन असते.
कॅफिनचे सेवन केल्यावर तुमचे शरीर ते लवकर शोषून घेते. त्या दोन तासात तुमच्या शरीरात त्याचा परिणाम होतो. कॅफिन शरीरातून बाहेर पडण्यासाठी किमान नऊ तास लागतात. हे पाणी आणि चरबीमध्ये सहज विरघळते. हे शरीरातील सर्व ऊतींमध्ये प्रवेश करू शकते.
म्हणूनच शरीरावर कॅफिनचा काय परिणाम होतो? शरीराच्या वेगवेगळ्या भागांवर त्याचा परिणाम का होऊ शकतो हे समजून घेण्याचा प्रयत्न करुया.
प्रौढांनी दररोज 400 मिलीग्रामपेक्षा जास्त कॅफिनचं सेवन करू नये असं अनेक तज्ज्ञ सांगतात.
जास्त प्रमाणात कॅफिन सेवन केल्याने स्नायूंची थरथर, डोकेदुखी, मळमळ, उलट्या आणि हृदयाचे ठोके जलद पडणे असे परिणाम होऊ शकतात. काही प्रकरणांमध्ये मृत्यूही होऊ शकतो.
जे लोक दिवसातून भरपूर चहा किंवा कॉफी पितात त्यांनाही चिडचिड, निद्रानाश आणि अस्वस्थता यासारखे दुष्परिणाम होतात. म्हणूनच अलीकडे कॅफिन सोडणाऱ्यांची संख्या वाढत आहे.
मेंदू कसा काम करतो?
कॉफी बंद केल्यामुळे डोकेदुखी आणि थकवा येऊ शकतो. असे का होते? तर शरीराला या पदार्थाची सवय झालेली असते. कॅफिन हे मेंदूतल्या एडेनोसिन या रिसेप्टरला धरुन ठेवते. यामुळे थकवा दूर ढकलला जातो. पण शेवटी काही काळाने मेंदूतल्या पेशी अधिक एडेनोसिन तयार करतात.
जेव्हा तुम्ही कॉफी घेणं थांबवता तेव्हा मेंदूत भरपूर प्रमाणात तयार झालेल्या या रिसेप्टरना बांधण्यासाठी काहीच शिल्लक राहिलेलं नसतं. त्यामुळे तुम्हाला सामान्यपणे जितका कंटाळा येतो, तुम्ही एरव्ही दमता त्यापेक्षा जास्त कंटाळा येतो, थकवा येतो.
डोकेदुखीच्या बाबतीतही असेच आहे. या पदार्थामुळे डोके आणि मानेतील रक्तवाहिन्या आकसतात. त्यामुळे मेंदूला रक्तपुरवठा कमी होतो.
परंतु, तुम्ही कॅफिन पिणे बंद केल्यानंतर 24 तासांनंतर तुमच्या रक्तपेशी सामान्य स्थितीत येतील. मेंदूला रक्तपुरवठा वाढवतो. यामुळे डोकेदुखी होते.
कॅफिन पिणे बंद केले तर आपल्याला नंतर जाणवणारी अस्वस्थता नऊ दिवस टिकते.
कॅफिनचा खरा परिणाम झोपेवरती होतो. दुपारी आणि संध्याकाळी केलेल्या कॅफिनच्या सेवनामुळे झोपेवर परिणाम होतो.
त्यामुळे मेलाटोनिन या झोपेशी संबंधित असलेल्या संप्रेरकाचं प्रसरण होण्यास 40मिनिटांचा विलंब होतो. त्यामुळेच झोपेत अडथळे येतात. कॅफिन एकूण झोपेची वेळ आणि गाढ झोपेचा कालावधी कमी करते.
यामुळे दुसऱ्या दिवशीही थकवा जाणवतो. त्यामुळे सकाळी जाग आल्यावर जी कॉफी घेता तिचा तुमच्या झोपेवर परिणाम होऊ शकतो.
तुम्ही कॅफिनचे सेवन बंद केल्यास तुमची झोप सुधारेल. काही पुरावे असे दर्शवतात की हे परिणाम 12 तासांच्या आत दिसतात.
तणाव आणि पॅनिक अटॅकमध्ये वाढही कॅफिनशी संबंधित आहे. कॅफिन कमी करणे किंवा ते पूर्णपणे काढून टाकणे तुमचा मूड सुधारू शकतो. चांगली झोप लागल्यामुळे तुमचा मूड सुधारतो.
निद्रानाश आणि अस्वस्थ झोप यामुळे तुम्हाला चिडचिड आणि थकवा जाणवतो. या वेगवेगळ्या मानसिक स्थिती आहेत.
कॅफिन एडेनोसिन रिसेप्टर्सला बांधून ठेवते ज्यामुळे इतर न्यूरोट्रांसमीटरमध्ये बदल होतो. या बदलांमुळे आपल्यात तणाव, आनंद, भीती या भावना निर्माण होतात.
कॅफिनचा हृदयावर काय परिणाम होतो?
कॅफिनचे सेवन कमी करणे किंवा ते पूर्ण थांबवणे देखील छातीत जळजळ आणि अपचन कमी करू शकते.
कॅफिनमुळे आपल्या पोटात आम्लयुक्त द्राव तयार होतो. त्यामुळे पचनसंस्थेत समस्या निर्माण होतात.
कॅफिन सोडल्याने रक्तदाब आणि हृदयाची गती कमी होऊ शकते. परंतु, हे सखोल आणि स्पष्टपणे जाणून घेण्यासाठी अधिक अभ्यास करणे आवश्यक आहे.
जर एखादी व्यक्ती अनेक वर्षे कॅफिनचे सेवन करत असेल तर त्यांच्या शरीराला त्याची सवय होते. तेव्हापासून हा एक नवीन घटक मज्जासंस्था, पचनसंस्था आणि हृदयाला उत्तेजन देत राहातो.
काही अभ्यास दर्शवतात की काही लोक इतरांपेक्षा कॅफिनने जास्त प्रभावित होतात. यावर अधिक संशोधन होणे गरजेचे आहे.
दात चमकतील
जर तुम्ही कॅफिनचे सेवन बंद केले तर तुमचे दात पांढरे होतील. हे थेट कॅफिनमुळे होत नाही.
चहा आणि कॉफीतल्या टॅनिनसारख्या पदार्थांमुळे असे घडते. हे पदार्थ दातांवर टिकून राहतात. त्यामुळे दातांचा रंग बदललेला असतो.
साखरेमुळेही तुमच्या दातांना इजा होऊ शकते. अनेक अभ्यासातून असे दिसून आले आहे की कॅफिनयुक्त पेये प्यायल्यामुळे लाळ कमी प्रमाणात निर्माण होते. त्यामुळे दाताचे नुकसान होते.
कॅफिनमुळे वारंवार लघवी होते
कॅफिनयुक्त पेयं प्यायल्याने पचनसंस्थेतील स्नायूंवर, विशेषत: मोठ्या आतड्यांवर परिणाम होतो. यामुळे वारंवार लघवी करण्याची इच्छा होते.
विशेषतः जर तुम्ही भरपूर कॅफिन प्यायलात तर त्याचा परिणाम शरीराच्या पाणी शोषण्याच्या क्षमतेवर होतो.
कॅफिनमुळे लघवी सुलभरित्या होते. त्यामुळे शरीरात जास्त प्रमाणात लघवी निर्माण होते.
कॅफिनमुळे मूत्राशयावर ताण येतो. यामुळे वारंवार लघवी करण्याची इच्छा होते. कॅफिन कमी केल्याने तुम्हाला बाथरूममध्ये जाण्याची शक्यता कमी होऊ शकते.
संतुलन
तुम्हाला तुमच्या आहारातून कॅफिन काढून टाकायचे असल्यास त्याचे प्रमाण हळूहळू कमी करणे चांगले.
तुम्ही कॅफिन घेणे अचानक बंद केल्यास, तुम्हाला डोकेदुखी आणि थकवा यांसारखे दुष्परिणाम जाणवू शकतात. पण, ते फक्त दोन ते तीन आठवड्यांसाठी असतील.
ही लक्षणे तुम्ही एका दिवसात किती कॅफिन घेता आणि किती वेळा तुम्ही कॅफिनचे सेवन करत आहात यावरही अवलंबून असतात.