कोव्हिड, फ्लू आणि अॅडिनोव्हायरस यांमध्ये काय फरक आहे?
बुधवार, 22 मार्च 2023 (13:49 IST)
ताप, खोकला, घशात खवखव... तुम्हाला किंवा तुमच्या घरातील कुणाला, विशेषतः लहान मुलांना अशी लक्षणं जाणवतायत का? असेल, तर हा लेख जरूर वाचा. कारण सध्या अनेक ठिकाणी एक नाही, दोन नाही तर तीन वेगवेगळ्या विषाणूंची साथ दिसून येते आहे.
गेल्या काही आठवड्यांत भारतात आणि महाराष्ट्रातही इन्फ्लुएंझा म्हणजे फ्लूच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ होते आहे. यात H3N2 या फ्लूच्या विषाणूसोबतच H1N1 म्हणजे स्वाईन फ्लूची लागण झालेल्या रुग्णांचाही समावेश आहे.
त्यातच राज्यात आणि विशेषत: मुंबईत कोव्हिडची रुग्णसंख्या गेल्या काही दिवसांत झपाट्यानं वाढतेय.
याशिवाय देशात काही ठिकाणी अॅडिनो विषाणूचाही प्रादुर्भाव जाणवतोय. लहान मुलांना याचा त्रास मोठ्या प्रमाणात होतो आहे.
पण हा अॅडिनोव्हायरस काय आहे? त्याची लक्षणं कोरोना विषाणू आणि इन्फ्लुएन्झापेक्षा किती वेगळी आहेत? तिन्ही व्हायरसपासून संरक्षणासाठी काय करावं? जाणून घेऊया.
अॅडिनोव्हायरस काय आहे?
अॅडिनोव्हायरस (AdV) हा श्वसनमार्गाला संसर्ग करणारा विषाणू असून इतर विषाणूंसारखे याचेही अनेक वेगवेगळे प्रकार आहेत.
विशेषतः लहान मुलांमध्ये याच्या संसर्गाचं प्रमाण जास्त असल्याचं आढळून येतं.
भारतात 15 मार्चच्या आकडेवारीनुसार पश्चिम बंगालमध्ये 12 हजारहून अधिक जणांना अॅडिनोव्हायरसची लागण झाली असून 19 मुलांचा मृत्यू झाला आहे.
बंगालमध्ये त्यावरून राजकारणही सुरू झालं.
तर मुंबईतही या विषाणूचा संसर्ग झालेल्या मुलांना रुग्णालयात दाखल व्हावं लागत असल्याचं या शहरातले बालरोगतज्ज्ञ सांगतात.
फ्लू, कोरोना, अॅडिनोव्हायरसमध्ये काय फरक आहे?
अॅडिनोव्हायरसची लक्षणं फ्लू सारखी असतात, पण हा विषाणू फ्लू आणि कोव्हिडच्या विषाणूंपेक्षा वेगळा आहे. मुख्य म्हणजे अॅडिनोव्हायरस हा एक डिएनए विषाणू आहे तर फ्लू आणि कोव्हिडचे विषाणू आरएनए विषाणू आहेत.
वरवर पाहता हे तिन्ही श्वसनसंस्थेवर हल्ला करणारे विषाणू आहेत आणि तिन्हीमध्ये सर्दी-खोकला-ताप ही लक्षणं आढळतात.
पण तिघांमुळे होणाऱ्या आजाराचं स्वरूप थोडं वेगळं आहे.
इंडियन मेडिकल असोसिएशनचे महाराष्ट्रातले माजी अध्यक्ष आणि आरोग्य विश्लेषक डॉ. अविनाश भोंडवे तिन्ही विषाणूंमुळे होणाऱ्या आजारातला फरक समजावून सांगतात.
ते म्हणतात, “आत्ता जो कोरोना विषाणू पसरत आहे, त्याची फार लक्षणं दिसत नाहीत. फक्त सर्दी-खोकला, अशी लक्षणं दिसत आहेत.
"कोरोना विषाणूच्या डेल्टा व्हेरियंटच्या साथीदरम्यान रुग्णांना श्वसनात अडथळे आणि न्यूमोनियाचा त्रास जाणवत होता, पण सध्याच्या व्हेरियंटमध्ये तुलनेनं कमी लक्षणं दिसतात.”
भोंडवे पुढे सांगतात, “H3N2 हा टाईप A फ्लूचा विषाणू आहे. त्यामध्ये सर्दी खोकला, अंग दुखणं, ताप येणं, लहान मुलांमध्ये उलट्या, जुलाब हा प्रकार होतो. खोकला साधारण आठवडाभरापर्यंत राहतो, जरी ताप दोन ते तीन दिवसांत कमी होतो.
“अॅडिनोव्हायरसमध्ये साधारण सर्दी-खोकला-ताप तर आहेच, पण त्यात डोळेपण येतात. डोळे खूप लाल होतात, हा फरक आहे. बऱ्याचदा याचा खोकला एक ते दोन आठवडे राहतो.”
अॅडिनोव्हायरसची लागण प्रौढांनाही होत असली, तरी लहान मुलांमध्ये तो जास्त घातक ठरत असल्याचं निरीक्षण बालरोगतज्ज्ञांनी नोंदवलं आहे.
लहान मुलांमध्ये या विषाणूचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढला तर न्यूमोनिया, ब्राँकायटिस, मेनिनजायटिस, हेपेटायटिस होऊ शकतो.
एवढ्या विषाणूंचा प्रादूर्भाव का वाढला?
कोव्हिडनंतर लोकांनी मास्क वापरणं बंद केलंय, गर्दी सुरू झाली आहे आणि अनेकांची इम्युनिटी म्हणजे रोगप्रतिकारक्षमता कमी झाली आहे. त्यामुळे हे आजार मोठ्या प्रमाणात पसरत असल्याचं काही तज्ज्ञांचं म्हणणं आहे.
डॉ. भोंडवे सांगतात, “केवळ तीनच नव्हे तर असंख्य व्हायरसेस भारतात महाराष्ट्रात दिसत आहेत. याचं मुख्य कारण म्हणजे गेले दोन तीन महिने दिवसाचं किमान तापमान 8 अंशांपर्यंत खाली आणि कमाल तपमान 35 अंशापर्यंत जात होतं.
"असा ज्यावेळेला तपमानात फरक पडतो, त्यावेळेला श्वसनसंस्थेला बाधित करणारे विषाणू मोठ्या प्रमाणात फोफावतात.”
मुंबईतील दादरच्या अश्विनी हॉस्पिटलमधील बालरोगतज्ज्ञ गीतांजली शहा मुलांमध्ये विषाणूंचं प्रमाण का वाढलं आहे याविषयी माहिती देतात.
“सध्या तापमान आणि आर्द्रतेमध्ये बरेच बदल होत आहेत आणि प्रदूषणही वाढलं आहे. त्यामुळे हे विषाणू मुलांच्या श्वसनसंस्थेवर आक्रमण करतात आणि आतल्या आवरणावर परिणाम करतात ज्यामुळे मुलांना जास्त त्रास होतो आहे.
“लहान मुलांना म्हणजे पंधरा वर्षांखालील मुलांना इन्फ्लुएंझा आणि अॅडिनोव्हायरस या दोन्हीचा त्रास होतो आहे. जी मुलं शाळकरी आहेत, त्यांना शाळेतून किंवा प्रवासादरम्यान संसर्ग होऊ शकतो. ज्या मुलांची रोगप्रतिकारक क्षमता कमी आहे, त्यांना या विषाणूचा जास्त त्रास होतो आहे.”
लहान मुलांची कशी काळजी घ्यायची?
अॅडिनोव्हायरसची लागण झाल्यानं मुलांना न्यूमोनिया किंवा ब्राँकायटिस होण्याची शक्यता असते.
त्यामुळे आईवडिलांनी मुलं आजरी पडल्यास काही गोष्टींवर बारीक लक्ष ठेवायला हवं, असं डॉ. गीतांजली शहा सांगतात. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार,
आईवडिलांनी मुलांच्या श्वसनाच्या गतीवर लक्ष ठेवावं.
पल्स ऑक्सिमीटरवर मुलांचा ऑक्सिजन तपासा, 95 पेक्षा कमी झाल्यास मुलांना लगेच डॉक्टरांकडे न्या.
मूल खूप मलूल झालं आहे का, किरकीर करतंय का याकडे लक्ष द्या.
मुलांच्या डोळ्यातून पस किंवा काही पाणी येतंय का हे पाहा
मुलांना जास्त जुलाब झाले तर डिहायड्रेशन होणार नाही याची काळजी घ्या.
अॅडिनोव्हायरसची लक्षणं पाच ते सात दिवसांत कमी होतात. या विषाणूवर काही वेगळे उपचार नाहीत, केवळ लक्षणांनुसार डॉक्टर उपचार करतात. त्यामुळे मुलांमध्ये कोणती लक्षणं दिसतायत हे पाहणं गरजेचं असतं.
विषाणूसंसर्ग टाळण्यासाठी काय करावं?
सरकारनंही आंतरराष्ट्रीय विमानतळांवर प्रवाशांचं थर्मल स्क्रीनिंग करण्यास सुरुवात केली आहे, आणि आरोग्य विभाग कोरोना विषाणूचा नवा व्हेरिएंट आलेला नाहीय ना, याचीही पडताळणी करत आहे.
याच वेळी लोकांनी काय करायला हवं, याविषयी आरोग्यतज्ज्ञांनी सल्ला दिला आहे.
विषाणूसंसर्ग टाळण्यासाठी काय करायचं?
प्रतिबंधात्मक लसीकरण - बूस्टर डोस घेणं विसरू नका - H3N2 आणि H1N1 या दोन्हीसाठी लस उपलब्ध आहे. फ्लू व्हॅक्सिन म्हणून ती ओळखली जाते. वर्षातून एकदा हा डोस घ्यायला हवा, विशेषतः ज्यांना अस्थमासारखे श्वसनाचे आजार आहेत.
गर्दीच्या ठिकाणी जाताना मास्क घाला, हात स्वच्छ धुवा
आजारी पडल्यास विलगीकरण - ताप, सर्दी, खोकला झाल्यास लोकांमध्ये मिसळणं टाळा आणि दोन-तीन दिवस घरीच आराम करा. लहान मुलांना अशा वेळेला शाळेत पाठवू नका.
लक्षणं तीव्र असतील किंवा ती जास्त काळ लांबली तर डॉक्टर्सचा सल्ला घ्या. ते लॅब टेस्टद्वारा आधी कुठला विषाणू आहे याचं निदान करतील. न्यूमोनियाचं निदान एक्स-रे स्कॅनद्वारा होऊ शकतं. खोकला वाढला, ताप लांबला, ऑक्सिजन कमी झाला तर अशा रुग्णांना रुग्णालयात दाखल करावी लागू शकते.
कॅन्सर, हृदयरोग, मधुमेह असे आजार असलेल्या व्यक्तींनी जास्त काळजी घ्यायला हवी.
पाणी भरपूर प्या कारण डीहायड्रेशनमुळे त्रास वाढू शकतो. सकस, चौरस आहार जेवा.
सर्वात महत्त्वाचं म्हणजे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कुठलीही अँटीबायोटिक्स किंवा अन्य औषधं घेऊ नका.