जाणून घेयुया या H3N2 इन्फ्लुएंझा व्हायरस बद्दल माहिती
शनिवार, 11 मार्च 2023 (14:35 IST)
सध्या H3N2 इन्फ्लुएंझा व्हायरस झपाट्याने पसरू लागला आहे. .
सध्या H3N2 इन्फ्लुएंझा व्हायरस झपाट्याने पसरू लागला आहे. सर्दी-खोकला, तापाचे रुग्ण झपाट्याने वाढू लागले आहेत. या इन्फ्लूएंझाच्या रुग्णांमध्ये विशेषत: खोकल्याची समस्या सर्वसामान्य आहे. अनेकांना खोकल्याच्या समस्येनं बेजार केलं आहे. या H3N2 इन्फ्लुएंझा व्हायरसमुळे आरोग्य प्रशासनही चिंतेत आहेत. रुग्णालयात तसेच आयसीयूमध्ये दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत असून आरोग्य अधिकाऱ्यांनी चाचण्या वाढवण्याचा सल्ला दिला आहे.जाणून घेयुया या H3N2 इन्फ्लुएंझा व्हायरस बद्दल माहिती.
H3N2 इन्फ्लूएंझा आणि कोरोनाचा संबंध काय?
एका शास्त्रज्ञानं मीडियाला दिलेल्या माहितीनुसार, कोरोना विषाणू आणि इन्फ्लूएंझा या दोन्ही आजाराची लक्षणं साधारणपणे एकसारखीच आहेत. या विषाणूचा संसर्ग वेगानं पसरत आहे. इन्फ्लूएंझा संशयित रुग्णांच्या नमुन्यांचीही कोरोना चाचणी केली जात असल्याची माहिती शास्त्रज्ञानं दिली आहे.
'मूळ विषाणूतील बदलामुळे रुग्णांमध्ये वाढ'
इंस्टिट्यूट ऑफ इंटर्नल मेडिसिन एज्युकेशनचे अध्यक्ष रणदीप गुलेरिया यांनी सांगितलं की, दरवर्षी या काळात H3N2 विषाणूचा प्रसार होतो. H3N2 विषाणू हा H1N1 विषाणूचं म्युटेशन म्हणजे मूळ विषाणूचाच बदललेला प्रकार आहे. विषाणू परिस्थितीनुसार स्वत: मध्ये बदल करतात. यामुळे ते अधिक धोकादायक बनतात. या म्युटेशनमुळे रुग्णांची संख्या वाढत आहे. रणदीप गुलेरिया यांनी सांगितलं की, "वर्षाच्या या वेळी जेव्हा हवामान बदलतं तेव्हा इन्फ्लूएंझा होण्याची शक्यता जास्त असते. आता कोरोना नसल्यामुळे लोकांनी मास्क घालणंही बंद केले आहे. ठिकठिकाणी गर्दी वाढताना दिसत आहे. अशा परिस्थितीत, विषाणू अधिक वेगाने पसरत आहे." गुलेरिया यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला माहिती देताना हे सांगितलं आहे.
नव्या इन्फ्लूएंझा (H3N2 विषाणू) ची प्रकरणे समोर येत आहेत
H3N2 इन्फ्लूएंझाच्या उद्रेकाने देशभरात चिंता वाढवली आहे. कोरोनाच्या प्रकोपातून तीन वर्षांनी देश सावरत असतानाच आता या नव्या इन्फ्लूएंझा (H3N2 विषाणू) ची प्रकरणे समोर येत आहेत. देशात या विषाणूचा झपाट्याने फैलाव होत असून त्या पार्श्वभूमीवर राज्या-राज्यांत सतर्तकतेचा इशारा देण्यात आला असून रुग्णांची व्यवस्था रुग्णालयांमध्येही करण्यात येत आहे. लहान मुलांपासून ते मोठ्या व्यक्तीपर्यंत अनेक जण या व्हायरसमुळे प्रभावित होत आहेत. मात्र यामुळे घाबरण्याचं काही एक कारण नाही. फक्त बाहेर पडताना मास्क लावून जावे, असा सल्ला तज्ज्ञ देत आहेत. तसेच जर एखाद्या व्यक्तीला सर्दी खोकला किंवा तापाची लक्षणं दिसत असतील तर त्यांच्यापासून दूर राहा.
H3N2 इन्फ्लूएंझा विषाणू हा कोरोनासारखाच हवेतून
एम्सचे माजी संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांच्या मते H3N2 इन्फ्लूएंझा विषाणू हा कोरोनासारखाच हवेतून थेंबांद्वारे पसरतो. ज्यांना सर्दी, खोकला आहे त्यांनी सावध राहणे गरजेचे आहे.
पुण्यात गेल्या महिन्यापासून लहान मुले पोटदुखी, उलटी, हगवण सारख्या आजाराने आजारी आहेत. ही लक्षणे बराच काळ राहत आहेत. त्यातच आता इन्फ्लुएन्झाने विविध राज्यांत हातपाय पसरण्यास सुरुवात केल्याने लहानांपासून थोरामोठ्यांपर्यंत सर्वच प्रकारचे विषाणू थैमान घालतील की काय अशी भीती वाटू लागली आहे.
H3N2 व्हायरसपासून संरक्षण कसं कराल?
फ्लूवरील वार्षिक लस घ्या.
हात नियमितपणे स्वच्छ धुवा. विशेषत: टायलेट नंतर, जेवणाआधी तसेच चेहरा किंवा नाकाला स्पर्श करण्याआधी हात साबणाने स्वच्छ धुवा.
कोरोना असणे आता धोकादायक नाही, परंतु जेव्हा रोगाच्या तीव्रतेत बदल होईल तेव्हा ते धोकादायक ठरेल. तर इन्फ्लूएन्झाच्या बाबतीत, रोगाच्या तीव्रतेत बदल होतो, म्हणून तो धोकादायक असतो. कोरोना आणि इन्फ्लूएंझाची लक्षणे सारखीच आहेत. तथापि, प्रकरणांमध्ये वाढ एकमेकांशी संबंधित नाही.
डॉक्टरांचे म्हणणे आहे की, भारतात ज्या दराने इन्फ्लूएन्झा प्रकरणे वाढली आहेत त्यावरून असे सूचित होते की, हा टप्पा बराच काळ टिकेल. खोकला आणि वेदना यांसारखी लक्षणे तीन आठवड्यांपर्यंत टिकू शकतात. दुसरीकडे, हंगामी ताप आणि खोकला साधारणपणे पाच ते सात दिवस टिकतो.
केरळ, कर्नाटक आणि महाराष्ट्रात अर्ध्याहून अधिक कोरोना सक्रिय प्रकरणे
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने बुधवारी सांगितले की, देशात कोरोनाचे 326 नवीन रुग्ण आढळले आहेत. यासह, 67 दिवसांनंतर सक्रिय रुग्णांची संख्या 3,000 च्या पुढे गेली आहे.
देशात कोरोनामुळे मृतांची संख्या 5,30,775 आहे, तर सक्रिय प्रकरणे 3,076 वर पोहोचली आहेत. त्याच वेळी, देशात कोरोनाचे 4.46 कोटी रुग्ण आढळले आहेत.
केरळ, कर्नाटक आणि महाराष्ट्रात निम्म्याहून अधिक कोरोनाचे सक्रिय रुग्ण आहेत. केरळमध्ये सर्वाधिक सक्रिय प्रकरणे 1474, कर्नाटक 445 आणि महाराष्ट्रात 379 आहेत.
Edited by : Ratnadeep Ranshoor