नाकातील रक्तस्राव तो सर्वसाधारणपणे उन्हाळ्याच्या तीव्र मोसमामध्ये होतो. सामान्यत: 10 -17 वर्षे वयोगटातील मुलांमध्ये आणि 50-65 वर्षे वयोगटातील ज्येष्ठ नागरिकांमध्ये या आजाराचे प्रमाण अधिक आहे. उन्हाळ्यामध्ये नाकातील रक्तवाहिन्या प्रसरण पावल्यामुळे तेथील श्लेष्मल पदार्थ वितळून रक्तस्राव होतो. उन्हाळ्यातील कोरड्या हवेमुळे नाकाच्या अंतर्भागातील श्लेष्मल पदार्थ कोरडा व शुष्क बनतो, त्यामुळे नाकातून रक्तस्राव होण्याचे प्रमाण वाढते. उन्हाळ्यातील हा रक्तस्राव टाळण्यासाठी कडक उन्हात व कोरड्या हवेत बाहेर जाणे टाळावे. दिवसातून एकदा सौम्य पाण्याचा वाफारा घ्यावा. नाकामध्ये दीर्घकाळ चोंदलेले नाक साफ करणारे औषध वारंवार टाकणे टाळावे. त्याऐवजी नाकाच्या अंतर्भागात सौम्य ओलसर वाफ, नाक साफ करायची वैद्यकीय पिचकारी किंवा नळी यांचा वापर करावा. तसेच नाकाच्या अंतर्भागात कडक पापुद्रे तयार होऊ नयेत म्हणून वॅसलिन सारखे औषध वापरावे.
घरगुती प्राथमिक उपचार म्हणून रक्त थांबवण्यासाठी नाक दाबून ठेवणे, बर्फाचा शेक घेणे असे करता येऊ शकते; परंतु या नंतरही नाकातील रक्तस्राव सतत होत राहिल्यास कान-नाक-घसा तज्ज्ञांकडून तातडीने प्रतिबंधात्मक उपाय योजावेत.