सगळा साजशृंगार पूर्ण झाला तरी ज्याच्याशिवाय चेहर्याला रूप येत नाही असा दागिणा म्हणजे नाकातील चमकी, नथ हे आभुषण. नासिकाभुषण हे सौभाग्यलंकार मानले गेल्याने प्रत्येक प्रांतात आणि परंपरामध्ये तिला वेगळे स्थान आहे.
पारंपरिक महराष्ट्रीयन दागिन्यांमध्ये अतिशय नावाजलेला असा हा दागिना. नऊवारि साडी असेल तर नथ हवीच. नथीमध्ये पूर्वीपासूनच्या पारंपरिक डिझाइंस रूढ आहेत. यात मराठा पध्दतीची नथ थोडी मोठी असते, तर ब्राह्मणी पध्दतीची नथ नाजूक असते. यशिवाय नक्षीदार विणकाम केल्यासारखी सरजाची नथही मिळते. महाराष्ट्रीयन स्त्रीचा साज हा नथीशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. नथ हा नासिकाभूषणातील एक महत्वाचा प्रकार असून हिंदू स्त्रियांत तो सौभाग्यालंकार म्हणूनच रूढ झाला आहे. आपल्या सवाष्णीचं लेणं म्हणून मान्यता पावलेली नथ, तिच्या आगळ्या नजाकतीसाठी अजूनही प्रसिद्ध आहे. पेशवेकाळापर्यंत नथ म्हणजे सोन्याचे एक कडे व त्याला अडकवलेले काही मोती असेच या दागिन्याचे स्वरूप होते. पेशवेकाळात जेव्हा महाराष्ट्राचे वैभव वाढले तेव्हा येथील तालेवार लोकांनी या मूळच्या नथीचे रूप बदलून तिला मोती जडवून व रत्ने लावून नथीचे नवे स्वरूप तयार केले.
आकाराच्या बाबतीत अधिक कलात्मक असलेलं हे नासिकाभूषण, महाराष्ट्रात सोन्याचा फास असलेल्या तारेत सात किंवा अधिक मोती व मधोमध लाल रत्ने बसविलेली, असंच नथीचं स्वरूप पाहावयास मिळतं. नथीला मुखरा असेही म्हणतात, नथ ही सामान्यत: एकाच नाकपुडीत घालतात. सौभाग्याची निदर्शक म्हणून विशेषत: सौभाग्यवती स्त्रिया नथ वापरतात.