'माझी मीच फेव्हरेट'

रूपाली बर्वे

शुक्रवार, 10 जून 2022 (15:17 IST)
'मैं अपनी फेवरेट हूं' हे प्रचलित वाक्य करीना कपूरने जब वी मीट या चित्रपटात म्हटलं होतं... अगदी सहज वाटणारं हे वाक्य स्वत:साठी किती प्रेम आणि आत्मविश्वास दर्शवतं. खरं तर प्रेम एक अशी भावना आहे, ज्यात एखाद्याप्रती सर्मपण आणि सोबत राहण्याची इच्छा असते. जेव्हा कुटुंबाव्यतिरिक्त इतर कोणावरही हे प्रेम वाटतं तेव्हा त्या व्यक्तीसोबत लग्नाच्या बंधनात अडकण्याची इच्छा असते. पण हे बंधन नकोसं वाटतं जेव्हा उन्मुक्त आकाशात पक्ष्याप्रमाणे मोकळा श्वास सोडावासा वाटतो. असे लोकं विरळ असतात जे स्वत:वर प्रेम करतात किंबहुना त्यांना याची कल्पनाच नसते की स्वत:वर प्रेम करणे म्हणजे आत्मविश्वासाने परिपूर्ण असणे, आपल्या आनंदासाठी कोणावर अवलंबून नसणे, न परवानगीची गरज, न जिवाची तडफड, न कुठली अपेक्षा न निराश होण्याची भावना...
 
स्वत:च्या जीवनातील कमतरता भरुन काढण्यासाठी लोक दुसर्‍याच्या प्रेमात पडतात.... मग सुरु होती अपेक्षा... आपली परिस्थिती बदलण्याची, मानसिक- आर्थिक आधाराची आणि सुख शोधण्याची... सुख नक्की म्हणजे काय हे चित्र स्पष्ट असणारे स्वत:च्या प्रेमात पडतात... आपल्यातील कमतरता त्यांना ताण देत नाही.. ते स्वत:वर निस्वार्थ प्रेम लुटवतात... स्वत:ला मान्य करतात... स्वत:चा कौतुक करतात... खरं म्हणजे स्वत:शी इश्क लढवतात... तर काय वाईट आहे त्यात...!
 
प्रत्येक जणच आनंदाच्या शोधात असतो... बहुतांश लोक हे बाह्य गोष्टींमध्ये आनंद शोधतात... पण त्या क्षणिक आनंदाचा ठेवा संपल्यावर पुन्हा रितेपणा वाट्याला येतोच... त्याहून आंतरीक आनंद शोधण्याच्या मार्गावर चालणे चूकीचे आहे काय?
 
भारतीय संस्कृतीत विवाह हे अत्यंत पवित्र नाते मानलं जातं हे खरं असलं तरी नात्यात अडकलंच पाहिजे का? हा प्रश्न हल्लीची पीढी विचारत असली तर काही कडू अनुभव त्यांच्या पदरी पडले असावेच... त्यातून मुली स्वत:च्या प्रेमात पडत असतील तर नक्कीच जोडीदार भेटल्यावर तिचं अस्तित्व कुठे तरी नाकारलं जात असावं... कारण प्रेमापेक्षाही एक महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणे सन्मान... आणि एकदा का नात्यात अडकलं की पदोपदी कधी आणि कसा ठेचला जातो मान... हे नकळतच, एक वेगळीच तडजोड सुरु होते... स्वत:ला सिद्ध करण्याची... पण खरोखर गरज आहे का याची...?
 
एक वेळ अशी देखील येते की हसत-खेळत खांद्यावर टाकलेल्या जवाबदारीचे ओझे उचलत असताना आयुष्यातील सर्वात सुंदर क्षण घालवलेल्या आणि प्रेमाच्या माणसांचा सन्मान देखील डोळ्यादेखील वाहून जाताना मुकाट्याने पाहावं लागतो आणि एकदा काय सन्मान हरवला तर आत्मविश्वासही सोबत निघून जातो...कितीतरी महिला स्वत:ची खरंच काही लायकीच नाही असा विचार करत प्रयत्न सोडतात आणि समर्पण करतात...
 
अशात जर काही ठाम मनाचे आत्मविश्वासी स्वत:वर प्रेम करु लागतात तर समाजाला हे देखील बघवतं नाही कारण हल्ली लोक असे झाले आहेत की... जर कुणी रडत असेल तर रडू द्या... आपल्याला काय? मात्र कुणी हसत असेल... तर आनंदी होण्याचं नेमकं कारण आहे तरी काय..?
 
या कल्पनेतून बाहेर पडली परिस्थिती ती स्वत:वर प्रेम करण्याची अर्थात स्वतःशी लग्न करण्याची ... ज्यात नवराच नवरी आणि नवरीच नवरा.... तस तरं गेल्या काही वर्षांत प्रेम किंवा विवाह हा दोन भिन्न लिंगांमधील विषय राहिलेला नाही.... अशी अनेक लग्ने पाहण्यात येते ज्यात दोन मुलांची लग्ने तर दोन मुलींची लग्न थाटामाटात झाली... पर सोलोगॅमी विवाहात तर जोडीदाराची गरजच नाही...
 
गुजरातच्या वडोदरा येथील क्षमा बिंदूने सोलोगॅमी विवाह करुन नव्या वादाला जन्म दिला असला तरी... याची सुरुवात 90 च्या दशकात झाली आहे. लिंडा बेकर नावाच्या महिलेने 1993 मध्ये स्वतःशी लग्न केले... लिंडा बेकरच्या लग्नाला प्रथम स्व-विवाहाचा दर्जा मिळाला.. सुमारे 75 लोक या विवाह सोहळ्याला उपस्थित होते.... 1993 नंतर असे अनेक प्रसंग आले आहेत जेव्हा लोकांनी असे विवाह केले आहेत...
 
आता सेल्फ मॅरेज असेल तर सेल्फ डिव्होर्स ही संकल्पनाही येणार हे नक्की. जिथे लग्न आहे तिथे घटस्फोटाचीही शक्यता असते. ब्राझिलियन मॉडेल ख्रिस गॅलेराने स्वतःला घटस्फोट दिला होता. कारण 90 दिवसांनंतर ती प्रेमात पडली होती... शेवटी काय प्रेमात पडणे...
 
मुली स्वत:च्या प्रेमात पडत आहेत कारण त्यांना मोकळा श्वास घेयचा आहे... वर्षानुवर्षे चालत आलेल्या समजुतींना चिकटून न राहता पुढे जायचे आहे... स्वावलंबी, यशस्वी असल्यामुळे कोणत्याही बंधनात अडकू राहयचं नाहीये.. स्वत:च्या आयुष्याचे निर्णय स्वत: घेयचे आहेत... जोडीदाराच्या अपेक्षा, कर्त्वय यात अडकायचं नाहीये...
 
मग प्रश्न हा देखील आहे की विवाहाची गरजचं काय? तर सोलोगॅमीसारख्या गोष्टी त्यांच्यासाठी समाजाच्या त्या प्रश्नाचं उत्तर देखील ठरु शकतं की लग्न कधी करणार? लग्न झाल्यावर पाळणा कधी हलणार... अशात एसेक्सुअल लोक देखील सोलोगॅमीला अधिक प्राधान्य देऊ शकतात... ज्याने स्व:विवाह केल्यावर अशा नजरांना उत्तर मिळतं... त्याहून महत्त्वाचं म्हणजे स्वत:च्या मनाला आवडत म्हणून नटून-थटून सोहळा पार पाडायचा... स्वत:च कौतुक करुन घ्यायचं... आणि शेवटी काय संसार थाटायचं मनात आली तरी पर्याय नेहमीच खुले असणारच...
 
क्वीन चित्रपटामधील हनिमूनला एकटीच परदेशी जाणारी कंगना राणौत असो किंवा हल्लीच्या वेबसीरीज असो... मनावर नक्कीच प्रभाव टाकतात... परंतु हे विषय सहजासहजी आले नसावे... यांची पार्श्वभूमी कुठतरी तर तयार झाली असावी... कारण प्रत्येक कथेमागे अनेक न ऐकलेल्या कहाण्या दडलेल्या असतात...
 
समाजासाठी मुलींचे हे पाऊल नक्कीच धोक्याची घंटा आहे कारण हा ट्रेंड वाढला तर वधू शोधण्यासाठी मुलांना धडपड करावी लागू शकते... गुजरातमधील नवविवाहित तरुणी अक्षदा देसाई यांचे म्हणणे आहे की हा निर्णय चुकीचा म्हणता येणार नाही मात्र प्रपंच मांडण्याची गरज देखील नाही. अशाने एकट्याने पुढे प्रगतीच्या मार्गावर जात असलेल्या मुलींना अडथळे येऊ शकता.. कदाचित त्यांचे पालक सचेत होऊन मुलींना वेळ न देता त्यांना लवकरात लवकर लग्नाच्या बेडीत बांधू शकतात.
 
तर कित्येक वर्षांपासून आपला संसार थाटाने सुरु असलेल्या महाराष्ट्राच्या शिल्पा कर्पे म्हणतात की घर-संसार आणि कुटुंब म्हटलं की जवाबदार्‍या, संघर्ष हे तर येणारच.. पण शेवटी यालाच तर आयुष्य जगणं म्हणतात... तडजोड करावी लागली तरी जेव्हा आपलं कुटुंब फुलताना दिसतं तेव्हा त्या आनंदाच्या क्षणाचे वर्णन आपण शब्दात करूच शकत नाही...
 
पण आता गरज आहे समाजाने देखील जरा विचार करण्याची... आईच्या पोटात असल्यापासून सुरु झालेला मुलीचा संघर्ष अखेर श्वासापर्यंत सुरुच राहतो...तिला स्वातंत्र्य देण्याची मागणी करण्याचा तर प्रश्‍नच चुकीचा ठरेल कारण तिच्यावर अधिकार गाजवण्याचा हक्क तुम्हाला दिला तरी कोणी? फक्त तिला जगू त्या.... उडू द्या... वाहू द्या... तर सृष्टी आपोआप बहरेल...

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती